Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
Youtstory

Brands

Resources

Stories

General

In-Depth

Announcement

Reports

News

Funding

Startup Sectors

Women in tech

Sportstech

Agritech

E-Commerce

Education

Lifestyle

Entertainment

Art & Culture

Travel & Leisure

Curtain Raiser

Wine and Food

YSTV

ADVERTISEMENT
Advertise with us

डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी चार दशकांपासून घेतलाय भारताला स्वच्छ करण्याचा वसा

डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी चार दशकांपासून घेतलाय भारताला स्वच्छ करण्याचा वसा

Wednesday May 04, 2016 , 9 min Read

हल्ली आपण सर्वजण 'स्वच्छ भारत' अभियानाचं नाव खूप ऐकतोय. 'मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स' सन २००० च्या आसपास सुरू झालं. पण गेली चार दशकं एक व्यक्ती मानवी मैला साफ करणाऱ्या समुदायाच्या विकासाकरता झटतेय. या समुदायाला या कामातून मुक्तता मिळावी याकरता अथक प्रयत्न करतेयं. मलनित्सारण व्यवस्थेत सुधारणा आणण्याकरता देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोलाची कामगिरी बजावत आहेत. सुलभ शौचालयाचं नाव आपण सगळ्यांनीच ऐकलंय. पण ही व्यवस्था सुरू करणाऱ्या डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्याबाबत फार कमी जणांना माहीत आहे. आतापर्यंत पद्मभूषण (१९९१), स्टॉकहोम वॉटर पुरस्कार (२००९), आंतरराष्ट्रीय सेंट फ्रान्सीस पुरस्कार, युएनइपी ग्लोबल ५०० स्क्रोल ऑफ ऑनर या प्रमुख पुरस्कारांसोबत ४६ पुरस्कार, ८ फेलोशीप्स, ५ सभासदत्व... डॉ पाठक यांच्या सन्मानांची यादी न संपणारी आहे. 

डॉ. बिंदेश्वर पाठक (फोटो सौजन्य-  सोल्युशन्सफॉरवॉटरडॉटओआरजी) 

डॉ. बिंदेश्वर पाठक (फोटो सौजन्य- सोल्युशन्सफॉरवॉटरडॉटओआरजी) 



अस्पृश्यतेची ओळख

"मी लहान असताना, आमच्या घरी बांबूचं सामान विकणारी एक बाई यायची. ती बाई निघून गेल्यावर माझी आजी अख्ख्या घरभर आणि अंगणात गोमुत्र शिंपडायची. घरी खूप लोकांची ये-जा असायची. पण ते गेल्यावर गोमुत्र शिंपडलं नाही जायचं. मला या बाईचं खूप कुतूहल वाटायचं. मी एकेदिवशी आजीला याबद्दल विचारलं. तिचं उत्तर होतं, ती बाई अस्पृश्य आहे. तिला हात लावल्यावर विटाळ होईल. माझ्यातलं कुतूहल अजून वाढलं आणि मी त्या बाईला स्पर्श केला. माझ्यावर काही परिणाम झाला नाही. पण माझ्या आजीने मात्र मोठा हंगामा केला. मोठ्याने रडू लागली. या गुन्ह्यातून कशी मुक्तता मिळेल हे जाणून घेण्याकरता भटजीला बोलावण्यात आलं. मी एक मोठा गुन्हेगार आहे अशा रितीने सर्वजण माझ्याकडे पाहू लागले. भटजींना उपाय सापडला".

भटजी म्हणाले, "तुम्ही याला शेण खाऊ घाला आणि गोमुत्र प्यायला द्या. नंतर हिवाळ्यात गंगा नदीत स्नान केलं पाहिजे. हे केल्यावरचं तो शुद्ध होईल". कोवळ्या वयातल्या डॉ पाठकांची अशाप्रकारे दिव्यातून जात स्पृश्य-अस्पृश्यतेशी गाठ पडली. 

 शिक्षक होण्याची आस

"पदवीच्या दुसऱ्या वर्षाला मी महाविद्यालयात पहिला आलो. मला शिष्यवृत्तीही मिळाली. पण तिसऱ्या वर्षाला मी क्रिमिनॉलॉजी विषय घेतला. पण मी त्यात फारसे गुण मिळवू शकलो नाही. त्याचा परिणाम माझ्या एकूण गुणांवर झाला आणि व्याख्याता होण्याची माझी संधी हुकली."

त्यानंतर ते एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. कमी पगाराची ही नोकरी होती. महिन्याला शंभर रुपयेही हातात पडायचे नाही. म्हणून एक वर्षभर त्यांनी औषध विक्रीसंबंधी व्यापार केला. मग पुन्हा अभ्यासाकडे वळण्याचं त्यांनी ठरवलं. पण नशिबाने काही वेगळचं ठरवलं होतं. डॉ पाठकांचा नशिबावर खूप विश्वास आहे. ते आपली कथा सांगतात, "माझा देवावर आणि नशिबावर विश्वास आहे. मी मध्यप्रदेशमधल्या सागर विद्यापीठात प्रवेश घेण्याकरता ट्रेननं प्रवास करत होतो. बिहारच्या हाजीपूर स्टेशनवर चहा प्यायला मी उतरलो. इतक्यात दोन व्यक्ती माझ्याजवळ आल्या आणि मला एका चांगल्या नोकरी विषयी सांगू लागल्या. मी पुढे न जाता, या नोकरीकरता प्रयत्न करण्याचे ठरवले. मी त्या कार्यालयात गेलो. तिथले प्रमुख उठले आणि मला म्हणाले, ही कायम नोकरी आहे असं तुला कोणी सांगितलं. ही समिती फक्त तीन वर्षांकरता आहे आणि एक वर्ष तर आधीच संपलयं". पण सागर विद्यापीठातली जागा तर गमावून बसल्याने, त्यांनी हाजीपूरला राहायचं ठरवलं. हिंदीचं इंग्रजीत भाषांतर आणि इंग्रजीच हिंदीत भाषांतर करणे असं या बिनपगारी नोकरीचं स्वरुप होतं. 

सर्वोदय चळवळीतले कार्यकर्ता राजेंद्र लाल दास यांनी १९६७ मध्ये डॉ पाठक यांना त्यांच्या कामात सहभागी होण्याचं आवाहन केलं. मैला साफ करणाऱ्या समुदायांच्या न्याय हक्कांकरता आणि त्यांना समाजात बरोबरीचं स्थान मिळवून देण्याच्या महात्मा गांधींच्या प्रयत्नांना मजबूत करण्याचं काम ते करायचे. डॉ पाठक सांगतात, "एखाद्या समुदायाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत मिसळायला हवे असं समाजशास्त्रात आम्हाला शिकवलं जातं". बिहारच्या बेट्टीहा जिल्ह्यात मैला वाहण्याचं काम करणाऱ्या समुदायासोबत त्यांनी तीन महिने वास्तव्य केलंं. ६० च्या दशकात भारतात ब्राह्मणाने अस्पृश्यांच्या सोबत राहणं सामाजिक अपराध मानलं जायचं.

परिवर्तनाचे तीन महिने

डॉ पाठक म्हणतात, "भारतात तुम्ही एखादा गंभीर गुन्हा केला तरी शिक्षा भोगून बाहेर आल्यावर मानानं जगू शकता. पण जर का तुम्ही अस्पृश्याच्या घरात जन्माला आलात तर अस्पृश्य म्हणूनच मराल. आणि मरणापेक्षाही वाईट परिस्थितीत जगाल. एक दिवस मी या समुदायातल्या एका नवविवाहितेला टाहो फोडून रडताना पाहिलं. तिने बेट्टीहा शहरात जाऊन सार्वजनिक शौचालयं साफ करावीत याकरता तिचे सासरचे तिच्यावर दबाव टाकत होते. मी तिच्या सासूला तिच्यावर जबरदस्ती का करता असं विचारलं. तिचं उत्तर होतं, ती काय करणार नाहीतर? ती बाजारात भाजी विकायला गेली तर कोणी भाजी विकत घेणार आहे का तिच्याकडून?" 

आणखी एका प्रसंगांमुळे डॉ पाठकांच्या मनावर खोल परिणाम झाला. एका मरणासन्न मुलाला तो केवळ अस्पृश्य होता म्हणून लोकांनी मदत करणं टाळलं आणि त्याला त्याच परिस्थितीत टाकून गेले. डॉ पाठकांच्या सासऱ्यांचाही त्यांना विरोध होता. डॉ पाठक सांगतात, "ते व्यवसायाने डॉक्टर होते. अतिशय श्रीमंत होते. एक दिवस ते मला म्हणाले, मला तुझं तोंडदेखील पाहायचं नाही. मोठ्यांना उलटून बोलणं ही आपली संस्कृती नाही. पण मी म्हणालो, मी इतिहासाची पानं उलटण्याचं ठरवलं आहे. मला महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करायचं आहे". 

आणि मग त्यांनी महात्मा गांधींच्या स्वप्नपूर्तीकरता प्रयत्न करण्याची शपथ घेतली. अशाप्रकारे एका वेगळ्या वाटेवरच्या प्रवासाला सुरुवात झाली. डॉ पाठकांनी मानवी मैला वाहण्याच्या अमानवी कामातून या समुदायाला बाहेर काढण्याकरता अनोखी पद्धत शोधून काढली. दोन खड्ड्यांद्वारे मैलाचा निचरा कमी किंमतीत करता येणारा तोडगा त्यांनी शोधून काढला.

image



सुलभ तंत्रज्ञानाची माहिती सुलभ इंटरनॅशनलच्या माहिती पुस्तकात सविस्तरपणे सांगण्यात आली आहे. "सुलभ तंत्रज्ञान अगदी साधंसरळ आहे. यात दोन पाणी आणि झाकणबंद पिंप असतात (2 pit pour flush toilet). दोन्ही पिंप एक आड एक वापरता येतात. एक पिंप भरला की मग मैला आपोआप दुसऱ्या पिंपात जमायला सुरूवात होते. त्या दरम्यान पहिला पिंप साधारण दोन वर्ष तसाच जमिनीत असतो. या दोन वर्षाच्या काळात मैल्याचं रुपांतर सेंद्रीय खतात होत. या खताला दुर्गंध नसतो, त्यामुळे कोणतेही रोग पसरत नाहीत. अगदी सहजपणे हे खत पिंपातून बाहेर काढता येतं. या पद्धतीत मानवी मैला हाताने साफ करावा लागत नाही. सर्व प्रकारच्या हवामानात आणि भौगोलिक परिस्थितीत मानवी मैला साफ करण्याची ही सुलभ शौचालयाची पद्धत वापरता येते. शहरांमध्ये अगदी सहजपणे ही पद्धत अंमलात आणता येते. मलवाहिनी अथवा सेप्टीक टँक नसला तरीही या पद्धतीने मैल्याचा निचरा केल्यास आरोग्याची समस्या निर्माण होत नाही. हे तंत्रज्ञान यशस्वी होण्याअाधी या कल्पनेवर इंजिनिअर्सचाही विश्वास बसत नव्हता". 

पूर्वी आणि आता

१९७३ मध्ये बिहारमधील अराह नगरपालिकेच्या आवारात सुलभ शौचालयाच्या प्रात्यक्षिकाकरता डॉ पाठकांना पाचशे रुपये देण्यात आले. औपचारिकरित्या सुरू झालेलं हे पहिलं सुलभ शौचालय. आतापर्यंत देशभरात १.३ कोटी सुलभ शौचालय बनवण्यात आली आहेत. मैला वाहणाऱ्या समुदायातल्या १० लाखांहून अधिक लोकांना या पद्धतीचं शिक्षण देण्यात आलं आणि या अमानवी पद्धतीतून त्यांची सुटका करण्यात आली. ६४० हून अधिक शहर मैल्याची मानवी वाहतूक बंद झाली.

डॉ पाठक म्हणतात, "१९७३ मध्ये ही पद्धत केवळ भारतात नाही तर जगात पहिल्यांदा अंमलात येत होती. बिहारमध्ये मी जेव्हा याबाबत लोकांशी संवाद साधायलो जायचो, तेव्हा लोकं म्हणायची चहा घेतल्यावर बोलूयात. शौचालयाच्या विषयावर चहा घेताना कसं बोलणार. कोणीही शौचालयांवर बोलायला तयार नसायचं".

ते पुढे त्यांचा अनुभव सांगतात, "बिहार सरकारने एक बैठक बोलावली होती. एक नगरविकास सचिव आणि पटना महानगरपालिकेचे आयुक्त असे दोन अधिकारी या बैठकीला हजर होते. पटना महापालिकेचे आयुक्त इंजिनिअर होते. इंजिनिअर असूनही त्यांनी या पद्धतीचा अभ्यास केला नव्हता. त्यांनी यात मोडता घालायला सुरूवात केली. ते पदावर असेपर्यंत सुलभ शौचालय पद्धत पटनामध्ये अंमलात न आणण्याचं त्यांनी ठरवलं. मग नगरविकास सचिव माझ्या मदतीला आले. ते म्हणाले, मी तुमच्या मताशी सहमत नाही. हे नवं तंत्रज्ञान आहे. आपण डॉ पाठकांंना संधी दिली पाहिजे. आपण अशा प्रकारची दोनशे शौचालयं बिहारमध्ये उभारूयात. जर यात यश आलं तर यामुळे भारताचा इतिहास बदलला जाईल". सुलभने बिहारमधील टोपली शौचालयाची जागा घेतली. पूर्वी लोक सेप्टीक टँक बसवायचे पण आता सुलभ शौचालयाची मागणी करू लागले. १९७३ साली सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमाची लाट फोफावू लागली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाने सुलभ शौचालय पद्धतीची दखल घेत, सविस्तर अहवाल सादर केला.

शाश्वत विकास या विषयावर २००२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक परिसंवादात जगभरात २०१५ पर्यंत २.६ अब्ज शौचालय बांधण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तर २०२५ पर्यंत संपूर्ण जनसंख्येकरता शौचालय सुविधा देण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलयं. 

गेल्या १३ वर्षात यात फक्त २.५ टक्क्यांनीच घट झालीय. याचं मुख्य कारण म्हणजे अजूनही मलाच्या निचऱ्याकरता जुन्या पद्धतीच्या मलवाहिन्यांवरचं अवलंबून असणे. सुलभ शौचालयाची पद्धतीचा अंगिकार न करणे. अफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतल्या देशांनी सुलभ शौचालय पद्धतीचा लवकरात लवकर अवलंब करायला हवा. या तीन प्रदेशांमध्ये निधीची कमतरता आहे. त्यामुळे कमी खर्चातल्या या पद्धतीचा अवलंब केल्यास फायद्याच ठरेल. जपानसारख्या प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या देशातही मानवी मैला टँकरनी कारखान्यांमध्ये आणला जातो. मग त्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते. मैला सेप्टीक टँकमध्ये साठवणे, मग तो साफ करणे आणि मग त्यावर खतनिर्मिती प्रक्रिया करणे या सर्व सोपस्कारांतून सुटका होऊ शकते.

आर्थिक फायदे

सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑरगनायझेशन खूप मोलाची कामगिरी बजावत आहे. पारंपरिक सेप्टीक टँकपेक्षा सुलभ टू पीट टँक कमी खर्चात बसवता येतो. सुलभ टू पीट पद्धतीचा वापर केल्यास वर्षाला ४९ हजार ५६ दशलक्ष लिटर पाण्याची बचत होते.

जातीच्या भिंती पाडून शिक्षणाचा वसा

डॉ. पाठकांच्या मते भारतात अस्पृश्यांचा सामाजिक स्वीकार करणं आवश्यक आहे. डॉ आंबेडकरांच्या समता आणि समानतेच्या तत्वावर डॉ पाठकही मार्गक्रमण करत आहेत. अस्पृश्यतेचा समूळ नायनाट झाला पाहिजे. ते म्हणतात, सर्वजण देवळात जाऊन आराधना करतील, एकाच तळ्यात सर्वजण आंघोळ करतील, एकाच विहिरीतून सर्वजण पाणी घेतील, एकत्र जेवतील तरच खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित होईल. राजस्थान मधील अलवारमध्ये हे डॉ पाठकांनी करून दाखवलं. 

शिक्षण ही विकासाची गुरूकिल्ली असल्याचं डॉ पाठक मानतात. ते म्हणतात, "शिक्षणामुळेच एखाद्या समाजाचा विकास होतो. आम्ही या समुदायाला हिंदी आणि इंग्रजीचं शिक्षण द्यायला सुरू केलं आहे. आम्ही त्यांना पुस्तकही देतो. त्यामुळे ते आता किमान १०-१५ हजार रुपये महिन्याला कमावू शकतात. परंपरागत काम सोडून वेगळ्या क्षेत्रात काम करायला त्यांनी सुरू केलं आहे. "

गांधीजी आणि डॉ आंबेडकरांचे कट्टर अनुयायी असणारे पाठक म्हणतात, "मी काही लोकांची जात बदलली नाही. ती तिच आहे, पण दर्जा मात्र बदलला आहे. आता त्यांना अस्पृश्य संबोधलं जात नाही. तेही आता उच्च जातीतील लोकांसोबत मिसळतात. त्यांच्यासोबत जेवतात. देशात हा चांगला मोठा बदल झाला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी मिळून हे केलं. गांधी आणि आंबेडकरांच्या सूत्रांनी या देशात बदलाचे चांगले वारे वाहत सामाजिक स्वास्थ प्रस्थापित होत आहे". 

प्रेरणा

डॉ पाठकांची आई त्यांना नेहमी म्हणायची, नेहमी मनुष्याची सेवा कर. ते म्हणतात, "मला खूप आनंद होतो. लोकांना भेटायला मला आवडतं. मी ज्या परिवर्तनाला सुरूवात केली. त्यात मिळणार यश मला माझ्या हयातीत बघायला मिळतयं यापेक्षा आणखी समाधान काय असणार".

सामाजिक शास्त्रज्ञ

डॉ पाठकांच्या मते ते सामाजिक शास्त्रज्ञ आहेत व्यावसायिक नाहीत. एका आयएएस अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं होतं की, कुठूनही ग्रांट घेऊ नका, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरता शुल्क आकारू नका. व्यवसाय म्हणजे खूप कमवा आणि खर्च कमी करा. सामाजिक कार्यक्रम म्हणजे खूप कमवा, खूप खर्च करा आणि कमी वाचवा. ते म्हणतात, " अपघाताने उद्योजकत्व माझ्याकडे आलं. मी काही व्यावसायिक नाही. मला सामाजिक शास्त्राचा अभ्यास करायचा होता. समाजाचे प्रश्न समजून ते सोडवायचे होते".

२७५ कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे मालक असणारे डॉ पाठक अतिशय विनम्र आहेत. मलनिस्सारण व्यवस्थेततल्या चांगल्या उपाययोजनांमुळे देशातल्या अस्पृशांचं जीवनमान बदललं. सामाजिक उपक्रमांकडे बघण्याची वेगळी दृष्टी ते आपल्याला देतात. तंत्रज्ञान, शोध आणि प्रभाव एकमेकांसोबत असतात हे त्यांनी पटवून दिलं.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा :

दुष्काळी भागात हरितक्रांती घडवणारा महापुरुष : सिमोन उराव

अंध वाचकांसाठी उमेश जेरे आणि सहकाऱ्यांचे निरपेक्ष कार्य

‘हिंडन’ नदीच्या पुनरुज्जीवनासाठीचा भगीरथ प्रयत्न म्हणजेच विक्रांत शर्मा

लेखिका - स्निग्धा सिन्हा

अनुवाद - साधना तिप्पनाकजे