दुष्काळी भागात हरितक्रांती घडवणारा महापुरुष : सिमोन उराव
काही जण गर्दीच्या मागे जात नाहीत. तर लोकच त्यांच्या पाठीमागे गर्दी करतात. त्यासाठी त्या माणसाकडे फार मोठे पद असण्याची आवश्यकता नसते. त्याच्याकडे चार-पाच पदव्या असण्याचीही गरज नाही. त्यासाठी मजबूत मनोनिग्रह आवश्यक आहे. कितीही अडथळे आले तरी ध्येयापासून दूर हटणार नाही हा निग्रह. ज्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता आहे, ती मंडळी विचलित होतात. जो ठाम निश्चयाने वाटचाल करतो त्याचे ध्येय पूर्ण होतेच.या काळात लोकांचा समूह त्यांचे अनुकरण करायला लागतो. ही सारी पात्रता ज्यांच्याकडे आहे असे ध्येयसाधक म्हणजे सिमोन उराव.
सिमोन उराव आज ८१ वर्षांचे आहेत. या वयातही जंगल वाचवणे आणि कोरड्या भागात हिरवाई परत येईल यासाठी प्रयत्न करणे हेच त्यांचे मिशन आहे. झारखंडची राजधानी रांचीपासून ३० किलोमीर अंतरावरच्या बेरो परिसरातले नागरिक दुष्काळ आणि जंगलतोडीमुळे त्रस्त होते. या नागरिकांचे सिमोन हे संकटमोचक ठरले आहेत. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण त्यांनी झाडांचे संवर्धन करण्यासाठी वापरला. नवी रोपं लावली. ही रोप जगावी यासाठी कष्ट घेतले. त्या रोपांना जगवलं. सिमोन उराव यांच्या या कष्टामुळे हा परिसर हिरवागार तर झालाच. शिवाय या भागातली आर्थिक सुबत्ताही परतली. सिमोन उरोव यांना त्या परिसरातले लोक आदराने ‘राजा साहेब’ किंवा ‘सिमोन राजा ‘ म्हणून हाक मारतात. झारखंडमधले छोटा नागपूरचे पठार बहुतेकांना माहिती आहे. पण या परिसरातल्या जंगलांवर स्वार्थी आणि माफिया मंडळींचा ताबा होता हे फार कमी लोकांना माहिती असेल. हा परिसर हिरवागार करण्याचा निर्धार सिमोन उराव यांनी केला. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी आपलं सारं आयुष्य झोकून दिलं. आज वयाच्या या टप्प्यावरही सिमोन ५१ गावांच्या मदतीनं आपलं हे ध्येय पूर्ण करण्यासाठी झटत आहेत.
सिमोन उराव यांना त्यांची मेहनत आणि वेडामुळे गावातल्या लोकांनी देवासमान दर्जा दिलाय. जंगलतोडीचा विरोध धनूष्य बाणाने केल्याबद्दल त्यांना तुरुंगातही जावे लागले आहे. सिमोन उराव यांनी ‘युअर स्टोरी’ला सांगितले,
- “ जंगल वाचवण्याचा आम्ही निर्धार केलाय. काहीही झाले तरी एकही झाड कापू देणार नाही. झाड वाचवण्याच्या प्रयत्नांमुळे माझ्याविरोधात खटले दाखल झाले. मला तुरुंगात डांबण्यात आलं. या दमननितीचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर गावक-यांच्या मदतीनं मी अत्यंत कडक नियम बनवले. एखाद्याने एक झाड तोडलं तर त्याला कमीत कमी पाच ते दहा नवी झाडं लावावी लागतील असा नियम मी तयार केला.”
सिमोन यांना लिहिता-वाचता येत नाही. असे असूनही ५० वर्षांच्या आपल्या या संघर्षमय प्रवासात त्यांनी या परिसरातल्या पर्यावरण रक्षणाचे आणि विकासाचे मोठे काम उभे केले आहे. सिमोन यांच्या कार्याची दखल जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठानेही घेतली आहे. या विद्यापीठाचा पीएचडीचा विद्यार्थी सारा ज्वेईटने आपल्या प्रबंधामध्ये त्यांचा उल्लेख केलाय. ज्वेईटने आपल्या शोध निबंधामध्ये सिमोन यांच्या पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीबद्दल लिहिलंय.
सिमोन उराव यांनी केवळ जंगल वसवलेलं नाही. तर आपल्या कष्टाच्या जोरावर बेरो परिसरातल्या सहा गावांमध्ये हरितक्रांती घडवली आहे. पंधरा वर्षांपूर्वी जी गावं वैराण होती आज त्याच गावात शेतकरी दुबार पिकांची निर्मिती करत आहेत. हे ऐकायला आश्चर्यकारक वाटत असेल तरीही खरं आहे. सिमोनमधील गावकरी बंधू भगत सांगतात, “ या भागात कालवा बांधण्याच्या मुद्यावर सर्व सरकारी अधिका-यांनी आपले हात वर केले होते. तरीही सिमोन यांनी हार मानली नाही. त्यांनी गाववाल्यांच्या मदतीनं स्वत:च तलाव बांधले.आतापर्यंत गावावल्यांच्या मदतीनं त्यांनी सहा बंधारे, पाच तलाव आणि डझनभर कालव्यांची उभारणी केली आहे. दुष्काळी प्रदेशातल्या शेतक-यांना याचा मोठा फायदा होत आहे.’’
सिमोन यांनी 'युअर स्टोरी'ला सांगितले,
- “ मी बंधारे आणि कालवे बांधण्यास सुरुवात केली त्यावेळी मला अनेक अडचणी आल्या. मी संपूर्ण परिसरात फिरलो. सर्व भागांचा अभ्यास केला. बंधारा कुठे बांधावा ज्याने पाण्याचा चांगला वापर होईल यावर संशोधन केले. ४५ फूट बंधारे बांधले आणि त्यामधील जलाशयाची खोली १० फूट असेल तर तो बंधारा पावसाचे पाणी साठवू शकेल असे मला आढळले.
याच मॉडेलचा स्विकार करुन मी बंधारे बांधले. त्यामुळे या परिसरातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे.”
सिमोन बाबा यांना पर्यावरणा रक्षणासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अमेरिकन मेडल ऑफ ऑनर लिमिटेड स्ट्राकिंगने २००२ या पुरस्कारासाठीही त्यांची निवड केलीआहे. तसेच अमेरिकेच्या बायोग्राफिक इंस्टीट्यूटनंही त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. झारखंड सरकारनेही २००८ साली राज्याच्या स्थापना दिवशी सिमोन यांचा सन्मान केला आहे. तसंच त्यांना अनेक कृषी आणि पर्यावरण क्षेत्रातले पुरस्कार मिळाले आहेत.
सिमोन हे पाच वर्षांपासून अथक काम करत आहेत. त्यांच्या अदम्य इच्छाशक्तीला सलाम
युवरस्टोरी वरील यशोगाथा, प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.
वरीलप्रमाणे आणखी काही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
दशरथ मांझी...पहाडाला हरवणारा माणूस !
गुंगा पहलवान: मूक साक्षीदार, सरकारी अनास्थेचा !
'हम होंगे कामयाब एक दिन!' - गतीमंद मुलांच्या भविष्याला आकार देणारी ‘तमाहर’
लेखक - रुबी सिंह
अनुवाद - डी.ओंकार