ज्ञानेश सुखथनकर यांच्या 'वुडनवंडर्स99'ची अनोखी दुनिया
मुंबईतल्या दादरच्या हिंदू कॉलनीत राहणाऱ्या ज्ञानेश सुखथनकर यांचं दीड वर्षांपूर्वी संपूर्ण जगच बदललं. त्यांच्या घरात एका चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले. त्यांच्या या चिमुकल्या मुलीबरोबर मग गोळा झाला असंख्य खेळण्यांचा गोतावळा. बार्बी, घोडागाडी, खुळखुळा, मोठे टेडीबेयर आणि इतर असंख्य. जसजशी ती मोठी होत होती तसतशी खेळण्यांची संख्या वाढतच होती. पण ज्ञानेश सुखथनकर यांना एक गोष्ट खटकत होती, ती म्हणजे या बहुतांश खेळण्यांमागे लिहिलेलं होतं 'मेड इन चायना'. याचा अर्थ असा की भारतीय खेळण्यांच्या मार्केटवर चीनचं राज्य आहे. आपल्याकडे कलाकुसर असताना, मुळची भारतीय बनावटीची असंख्य खेळणी असताना चीनकडून अशी ही प्रत्येक क्षेत्रात होणारी घुसखोरी का सहन करायची असं ज्ञानेश यांना वाटून गेलं. आपण आपल्यापरीनं तरी या परिस्थितीवर काहीना काही तोडगा काढायला हवा आणि लोकांनीही आपल्या मेक इन इंडियातल्या खेळण्यांचा स्विकार आणि प्रसार करायला हवा असं त्यांना वाटून गेलं आणि त्यातूनच निर्मिती झाली 'वुडनवंडर्स99'ची...
मेड इन चायनाच्या खेळण्यांचं निरिक्षण करताना ज्ञानेश यांच्या लक्षात आलं की ही खेळणी लहान मुलांसाठी आरोग्याला फारशी चांगली नसतात. बहुतांश प्लास्टीकपासून बनलेली ही खेळणी आणि त्यातलं टॉक्सिक एलिमेंट मुलांच्या मेंदूला अपायकारक ठरू शकतात. एका सर्वेक्षणातही हे स्पष्ट झालं होतं. मग या चीनच्या खेळण्यांना लाकडी खेळणी पर्याय असू शकतो, असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला आणि त्यातून एक- एक खेळणं आकाराला येऊ लागलं त्याचबरोबर आकाराला येऊ लागली वुडनवंडर्सची अनोखी दुनिया. “खेळणी प्रत्येक लहानमुलाला आवडतात, ते त्यांचे साथीदार असतात. पण ती चीनचीच का असावी असा माझा प्रश्न होता. लहानपणापासून मला चित्रांची आवड होती, मी ती उत्तम काढायचो. क्राफ्टींगचीही थोडी आवड होती. आधी मी आवड म्हणूनच ही खेळणी बनवायला सुरुवात केली. एक एक खेळणी बनवताना त्यांचा चांगला संच तयार झाला. ज्यांनी ही पाहिली तेही खुश झाले. अनेकांनी आपल्या ऑडर्सही दिल्या. यातूनच माझा आत्मविश्वास वाढला आणि मग वुडनवंडर्स99ची स्थापना झाली. आता माझं कलेक्शन चांगलच वाढलं आहे.”
संपूर्ण लाकडी बाईक्स, हेलीकॉप्टर, सायकल, लाकडी रणगाडा, रेल्वे इंजिन, घोडा असं सर्वकाही वुडनवंडर्सचा भाग आहेत. त्यांचा आकार आणि त्याची आकर्षक रंगसंगती ही वुडन वंडर्सची जमेची बाजू आहे. मेड इन चायनाच्या प्लास्टिक खेळण्यापेक्षा ते जास्त आकर्षक आणि हाताळायला सोपी आहेत आणि मुख्य म्हणजे मजबूतही आहेत. शिवाय ही फक्त लहान मुलांना खेळायला वापरता येऊ शकतात असं नव्हे तर ती मोठी झाल्यानंतर त्यांना शोकेसमध्येही ठेवली जाऊ शकतात, वर्षानुवर्षे तशीच राहू शकतात. शिवाय लोकांना हवी तश्या आकाराची आणि रंगसंगतीची खेळणी वुडनवंडर्स99 देतं, यामुळे आमची एक्लुसिव्ह खेळणी असल्याचा आम्हाला वेगळा आनंद आहे.
वुडनवंडर्सचं फेसबुकपेज तयार करण्यात आलंय. त्याद्वारेच सध्या ज्ञानेश आपल्या या लाकडी खेळणी आणि इतर गोष्टींचं प्रदर्शन आणि विक्री करतायत. “ माऊथ पब्लिसिटी अर्थात लोकांनी एकमेकांना सांगितल्यानं वुडनवंडर्स99ला चांगला फायदा झाला. एक वस्तू बनवायला एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो. प्रारंभिक नियोजनापासून ते लाकडाला आकार देण्यापर्यंत आणि त्याची रंगसंगती ठरवण्यापर्यंत सर्वकाही मी करतो. पुढे माझ्यासारख्या अनेकांना यामुळे रोजगारही उपलब्ध होईल. हळूहळू इ-कॉमर्सच्या माध्यमातून वुडनवंडर्सचा विस्तार करण्याचा माझा विचार आहे.” ज्ञानेश सांगत होते.
फक्त खेळणीच नव्हे तर लाकडी खुर्च्या आणि इतर गृहपयोगी गोष्टीही वुडनवंडर्स99अंतर्गत बनवल्या जात आहेत. प्लास्टिक हा पर्यावरणाला घातक आहे. त्याचं विघटन होत नाही. जाळलं तर त्यापासून प्रदूषण होतं. शिवाय ते टिकावूही नसतं. एकदा का खराब झालं तर फेकून देणं हाच एक पर्याय असू शकतो. याविरोधात लाकडी वस्तू. त्यांचा वापर अनेक गोष्टींसाठी करता येतो. यामुळेच जास्तीत जास्त नैसर्गिक असलेल्या लाकडी वस्तूंना प्रोत्साहन द्यायला हवं असं ज्ञानेश सांगतात.
हळूहळू वुडनवंडर्स99ची व्याप्ती वाढत जातेय. सध्या ज्ञानेश आपली नोकरी सांभाळून कायद्याचं शिक्षण घेताना त्यांनी आपल्यातला क्रिएटीव्ह उद्योजक जपलाय. वुडनवंडर्सला पुढे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घेऊन जाण्याचा त्यांचा मनसुबा आहे. ज्ञानेश सांगतात “सध्या मी नोकरी करतोय, पण नोकरीचा काही भरोसा नाही. त्यामुळे मला माझा व्यवसाय सुरु करायचाय. क्राफ्टींगच्या या छंदाला व्यवसायाचं रुप देण्याची मजा ही वेगळी आहे. यामुळे सध्या तो जास्तीत जास्त कसा वाढवता येईल यावर माझा जोर आहे.”
आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :