बदलत्या काळानुसार घरोघरी लाकडी खेळणी पुन्हा वापरली जातील ? गोदावरी सिंह यांची संघर्ष गाथा
समाज हा व्यापक समूह असतो, अनेक लहान-मोठया समुदायांचा त्यात अंतर्भाव होतो. प्रत्येक समाजाने त्याच्या उदर-निर्वाहाच्या गरजा भागवण्याची व्यवस्था केली असते. प्रत्येक समाज हा आत्मनिर्भर असतो, आपले अस्तित्व पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवण्याची क्षमता समाजात असते. प्रत्येक समाजात स्वयंसातत्यशीलता, अखंडता असते. बनारस मधल्या अशाच एका समाजाबद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्या समाजाने आपल्या विविध कलाकृतीच्या माध्यमातून जगभरात वेगळाच ठसा उमटवला आहे. बनारस या जुन्या नगरीची प्रत्येक गोष्ट अनोखी व नैसर्गिकपणे जोपासलेली आहे . या शहराच्या हवेत नक्कीच अशी विशेष गोष्ट आहे जी पिढी दर पिढी एकच काम करूनही लोकांचा उत्साह कधीच कमी होत नाही. ज्या कलेने पूर्ण बनारसला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्या कलेवर प्रत्येकाला गर्व आहे. आज पण त्या कलेचा नगारा पूर्ण जगभर वाजतो. हो, आलं का काही लक्षात? आपल्या नव्या पिढीसाठी लाकडाची खेळणी भलेही नवीन असेल, पण आपल्यातील बरेचसे असे लोक आहेत जे त्यांच्या बालपणी या खेळांमध्ये रमले असतील. कधी बाहुला बाहुली तर कधी राजा राणीच्या रुपात ही खेळणी मुलांना आपल्याकडे आकर्षित करतात. घराच्या अंगणात भंवरा नाचवत, खुळखुळा वाजवत मुलांचा आवाज आजपण आपल्या कानात घुमतो पण ते दिवस आता लोप पावले. आधुनिक काळात लाकडाच्या खेळण्याची जागा प्लास्टिकच्या महागडया खेळण्यांनी घेतली. बदलत्या काळाचाच परिणाम आहे की काशीची ही कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अशातच नामशेष होणा-या लाकडी खेळण्याच्या व्यवसायाला वाचवण्याचा संघर्ष ७५ वर्षाच्या गोदावरी सिंह हे करत आहे. उतार वयाच्या या टप्प्यावर पण गोदावरी सिंह यांना पूर्ण विश्वास आहे की बदलत्या काळानुसार घरोघरी लाकडी खेळणी पुन्हा वापरली जातील. गोदावरी सिंह यांची संघर्ष गाथा सांगण्या अगोदर तुम्हाला बनारसच्या अद्वितीय कलेशी आपण ओळख करून घेऊ या.
बनारस हे जगातील एकमेव शहर आहे, जिथे कारागिरीबरोबरच हस्तकौशल्याच्या जवळपास ६० विविध प्रकारांनी देशातच नाही तर पूर्ण जगात आपला ठसा उमटवला होता, पण आता यांच्यापैकी अनेक उद्योग एकतर बंद झाले किंवा त्या मार्गावर आहे. यापैकीच एक आहे बनारसच्या लाकडी खेळण्याचा व्यवसाय. या खेळण्या्ंबद्दल सांगायचे झाले तर यांची बनावट अतिशय सुंदर व बोलकी असते. कधी करोडों मध्ये होणारा हा व्यवसाय आता लाखांमध्ये आला असल्यामुळे ही खेळणी बनवणाऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे.
अशातच गोदावरी सिंह संकटमोचन बनून या जुन्या व्यवसायाला वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या व्यवसायाच्या संवर्धनासाठी गोदावरी सिंह यांनी त्यांच्याकडून शक्य तितके प्रयत्न केले. गोरखपूर निवासी गोदावरी सिंह आजपासून सुमारे साठ वर्ष अगोदर बनारस येथील काश्मीर गंज भागात पोहचले. गोदावरी सिंह यांचे आजोबा व वडिल याच व्यवसायाशी निगडीत होते, त्यांच्या देखरेखीखाली गोदावरी सिंह यांनी या व्यवसायाचे बारकावे समजवून घेतले. मंदी व आधुनिकीकरणाच्या काळ्या ढगांनी काशीच्या व्यवसायाला ग्रहण लागले. १९८० च्या दशकानंतर लाकडाच्या खेळणीचा व्यवसाय तेजीत घटला व खेळण्यांचा आवाज येणे बंद झाले म्हणून या डबघाईला आलेल्या व्यवसायाला वाचवण्यासाठी गोदावरी सिंह पुढे आले. ७५ वर्षीय गोदावरी सिंह जवळजवळ ३५ वर्षांपासून दिवस रात्र लुप्त पावणाऱ्या या कलेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहे.
गोदावरी सिंह प्रत्येक अशा व्यक्तीला भेटतात जिथे त्यांना मदतीची अपेक्षा आहे. बनारस मध्ये टॉम मॅन च्या रुपात प्रसिद्ध असलेले गोदावरी सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपल्या लुप्त होणाऱ्या कलेला जोपासण्याची विनंती केली. गोदावरी सिंह यांनी युवर स्टोरीला सांगितले की, "मागच्या दोन वर्षामध्ये मी नरेंद्र मोदी यांना दोन वेळेस भेटलो, काशी प्रवासादरम्यान त्यांनी मला भेटण्यासाठी बोलावले या भेटीदरम्यान त्यांनी माझी विनंती ऐकली व या व्यवसायाला वाचवण्याचे आश्वासन दिले. पण वाईट वाटते की आतापर्यंत या कार्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाही. पण मला आशा आहे की मोदी साहेब माझ्या सारख्या हजारो कलाकारांना निराश करणार नाही".
मुख्यतः या व्यवसायाशी बनारस मधील जवळजवळ तीन हजार कारागीर जोडलेले आहे. शतकांपूर्वी या शहरातील काश्मिरी गंज, खोजवा, भेलपुर, सरायनंदन या भागात हा व्यवसाय सुरु आहे. पण आता या कारागिरांपुढे उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. हा व्यवसाय मागे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने दाखवलेली उदासीनता. मागच्या काही वर्षांपासून या सुंदर खेळण्यांना बनवण्यासाठी वापरण्यात येणारी कोरइयाचे लाकूड कापण्यास सरकारने बंदी आणली आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लाकडाचा वापर दुसऱ्या कोणत्याही वस्तूसाठी होत नाही. म्हणून आता निलगिरीच्या लाकडांचा वापर होऊ लागला आहे ज्यामुळे खेळण्यांमधील नैसर्गिक चमक गायप होऊन खेळण्यां मधील आपलेपणा नाहीसा झाला आहे. गोदावरी सिंह सांगतात की, "सरकारच्या इच्छेने या व्यवसायाला नवीन उभारी येवू शकते, पण त्यांच्या नितीवरून असे वाटत नाही".
मागच्या ३५ वर्षापासून अनेक अडचणींवर मात करून गोदावरी सिंह यांचा संघर्ष सुरूच आहे. त्यांच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे की २००५ मध्ये गणतंत्र दिवसाच्या नाट्यकलाकृती सादरीकरणा मध्ये युपी तर्फे लाकडी खेळणीच्या व्यवसायाचा विषय ठेवला होता. या नाट्यकलाकृती मध्ये गोदावरी सिंह स्वतः आपल्या पत्नी बरोबर उपस्थित होते. उत्कृष्ट कलेसाठी या कलाकृतीला तिसरे स्थान मिळाले व पूर्ण देशात युपीचा ढोल वाजला. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांचा सन्मान केला. कलेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रधानमंत्री मनमोहन सिंह व चंद्रशेखर यांनी त्यांना सन्मानित केले.
गोदावरी सिंह यांनी स्व:खर्चाने ३०० पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित केले. त्यांना खेळणी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे अवजार दिले, मशीन लावल्या व आज हजारो लोकांचे ते देवदूत बनले आहे. गोदावरी सिंह यांच्या संघर्षानेच आज लाकडी खेळण्याचा व्यवसाय हा अजूनही तग धरून आहे. मार्च २०१५ मध्ये काही स्वयंसेवी संस्थानांच्या मदतीने गोदावरी सिंह यांनी या कलेचे पेटंट तयार केले. त्यांची इच्छा आहे की हा व्यवसाय पुन्हा उभारावा यासाठी गोदावरी सिंह घरच्या नव्या पिढीला चालना देत आहे. आपल्या म्हाताऱ्या आजोबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा नातू उदयराज पुढे सरसावला. एमबीएचा अभ्यास करणारा उदयराज या व्यवसायाला अद्यावत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सामान्यतः या व्यवसायाशी गरीब व मजदूर वर्गातील लोक जोडलेले आहे म्हणून मालाची विक्री व त्याचा दर्जा यांची सांगड जमत नव्हती. पण जशी नव्या पिढीने या व्यवसायाची धुरा सांभाळली तशी हा व्यवसायाच्या वृद्धीसाठी एक नवीन उमेद निर्माण झाली आहे. गोदावरी सिंह यांच्या मेहनतीनेच आज वाराणसीच्या फाईव स्टार हॉटेलने आपली एक गैलरी काशीच्या या अनोख्या कलेला समर्पित केलेली आहे. आता पूर्ण वर्षभर या गॅलरीमध्ये या कलेचे प्रदर्शन भरते. कारण की परदेशी पर्यटक पण या लाकडाच्या खेळण्यांमध्ये रुची घेत आहे. निश्चितच ही कला सदैव गोदावारी सिंह यांच्या मेहनतीची व जिद्दीची ऋणी राहील. आशा आहे की काशीच्या या कलेमध्ये गोदावरी सिंह यांनी जे रंग भरले ते काळानुसार अजून पक्के होतील.
आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.
आता वाचा संबंधित कथा :
परंपरेला आधुनिकतेची जोड हवीच...
२१व्या शतकातील 'ढेपेवाडा' एक जिंदादिल वास्तू
‘नवरंग’ म्हणजे हस्तकलेत निपुण असलेल्या कारागिरांची संजीवनी
लेखक : आशुतोष सिंग
अनुवाद : किरण ठाकरे