फक्त पाच रुपयात पोटभर जेवण, गरिबांसाठी असलेलं 'राज रोटी सेंटर'
मुंबईत आजही अनेक लोकं आहेत ज्यांना पोटभर अन्न मिळत नाही. शहरातल्या प्रत्येक सिग्नलवर असे अनेकजण आपल्याला पहायला मिळतात. हाताला काम नाही, काम असेल तर पुरेसे पैसे मिळत नाहीत. मग उपाशीपोटी झोपावं लागतं. अशा अनेक कहाण्या मुंबई शहरात ऐकायला मिळतील. यामुळेच श्रीमद रामचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटरनं यावर उपाय काढलाय. शहरात कुणाला उपाशी झोपू द्यायचं नाही. या शहरातल्या प्रत्येकाच्या पोटात अन्न गेलं पाहिजे. यासाठीच मुलुंड आणि माटुंगा इथं 'राज रोटी सेंटर' उघडण्यात आलंय. या उपक्रमाद्वारे सहा चपात्या, भाजी, भात आणि एक केळं असं सर्व काही फक्त पाच रुपयात देण्यात येत आहे.
“ मुंबई शहराची एक गम्मतच आहे. इथं तुम्हाला टोलेजंग इमारती दिसतात. आलीशान गाड्या दिसतात, रोजच मोठमोठे मॉल उभे राहतायत. तिथं जाण्यासाठी लोकांची रांग लागते. पण याचवेळी या शहरात दुसरा एक असा गट आहे ज्याच्या नशीबात दोन वेळच्या अन्नासाठी दिवसभर राबावं लागतं. दिवसभर भटकूनही अनेकांना पोटभर अन्न मिळत नाही. आम्ही श्रीमद रामचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटरतर्फे अशाच तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो. अशा लोकांसाठी आपण काही तरी करायला हवं, कुणी भुकेला राहू नये असं आम्हाला वाटतं. या भावनेतूनच श्री राज रोटी सेंटरची स्थापना करण्यात आलीय.” श्री राज रोटी सेंटर सुरु करण्यात अग्रणी असलेल्या डॉक्टर मीना घोषर सांगत होत्या.
माटुंगा आणि मुलुंड या दोन ठिकाणी राज रोटी सेंटर सुरु करण्यात आले आहे. मुलुंड इथं गेल्या पाच वर्षांपासून हे सेंटर सुरु आहे. माटुंग्याचं नुकतंच सुरु झालंय. “ आम्ही राज रोटी सेंटर सुरु करताना एक विचार केला होती की कुणालाही भुकेलं राहू द्यायचं नाही. पण नंतर आमच्या लक्षात आलं की भुकेला राहण्यामागे अनेक कारणं आहेत. पैसे नसणं हा एक गट झाला. पण या शहरात वृध्दांची संख्याही जास्त आहे. मुलं मोठी झाली वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेली. अशावेळी एकाकी आयुष्य जगणाऱ्या या वृध्दांची खाण्याची फार परवड होत असते. घरी बनवणारं कुणी नाही. वाढत्या वयामुळं त्यांना स्वत:ला बनवताही येत नाही. हॉटेलचं किती दिवस खाणार, त्याने आरोग्याला होणारा त्रास तो वेगळाच. म्हणून अशा वृध्दांना आम्ही राज रोटी सेंटरतर्फे डब्बा पाठवतो. कमीत कमी पाच रुपये आणि अगदी घरच्या सारखं पौष्टीक जेवण असं असल्यानं त्यांचा आत्मसन्मानही दुखावला जात नाही. गरीब व्यक्तींचं ही तेच आहे. त्यांना सर्व काही फुकटात नको असतं. गरीबांनाही आत्मसन्मान असतोच की, म्हणून आम्ही पाच रुपये इतकी कमी किंमत ठेवलीय.” मीना घोषर यांनी पाच रुपये किंमत ठेवण्यामागचं कारण स्पष्ट केलं.
आपल्या या रोटी सेंटरबद्दल लोकांना समजावं म्हणून व्हॉटसअप आणि फेसबुक सारख्या आधुनिक माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. अनेक ग्रुप तयार करुन त्यावर या राज रोटी सेंटरची माहिती देण्यात येतेय. जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. “ आमचं मुलुंड सेंटर सुरु झालं त्याला पाच वर्षे झाली तिथं सकाळी ११ ते दुपारी १ अशी पाच रुपयात फुट पॅकेट घेणाऱ्यांची संख्या चांगली आहे. मोठी रांगच लागते. माटुंग्याचं सेंटर आता नुकतंच सुरु केलंय. गरजू लोकं तिथपर्यंत यावेत यासाठी आम्ही नव्या माध्यमांचा वापर केलाय. यामुळे इथं येणाऱ्या लोकांची संख्याही वाढतेय. “ मीना सांगत होत्या.
माटुंग्याचं सेंटर संपूर्णपणे महिला चालवतात. हे अन्न तयार करण्यासाठी लागणारं साहित्य लोकवर्गणीतून येतं. या महिला आपल्या घरचं काम पूर्ण झाल्यावर इथं सेवा देतात. सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत इथं येणाऱ्या प्रत्येकाला अगदी हसऱ्या चेहऱ्यानं फुड पॅकेट देतात. मीना सांगतात “ आम्ही सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. आमच्या दृष्टीनं राज रोटी सेंटर ही मानव सेवा आहे. अगदी कमी पैश्यात मिळणारं अन्नाचं पॅकेट हाती पडल्यावर या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो तोच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता या शहरात कुणी भुकेला राहणार नाही, असा आम्हाला विश्वास वाटतोय.”
श्री राज रोटी सेंटर कोलकाता इथं ही सुरु करण्यात आलंय.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :