Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
Youtstory

Brands

Resources

Stories

General

In-Depth

Announcement

Reports

News

Funding

Startup Sectors

Women in tech

Sportstech

Agritech

E-Commerce

Education

Lifestyle

Entertainment

Art & Culture

Travel & Leisure

Curtain Raiser

Wine and Food

YSTV

ADVERTISEMENT
Advertise with us

फक्त मदत नको हाताला काम द्या.. दुष्काळग्रस्तांची मागणी

फक्त मदत नको हाताला काम द्या.. दुष्काळग्रस्तांची मागणी

Tuesday April 19, 2016 , 4 min Read

ठाण्यातल्या गावदेवी मैदानात महाराष्ट्र व्यापारी पेठ (गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री) चे आयोजन करण्यात आले आहे. बाजारपेठेच्या मंडपापासून अगदी काही फूटावर वेगळा असा स्टॉल लोकांचं लक्ष केंद्रीत करतोय. हा खाण्याचा स्टॉल आहे, पोळीभाजी केंद्र नाही. गावाकडील खरपूस वांग्याच्या भरताचा सुगंध इथे येतो. या स्टॉलवरच्या एक ताई भाकऱ्या भाजतायत... दुसऱ्या ताई गरमा गरम थालीपीठ भाजत आहे. हे सर्व पाहिलं की गावाकडची आठवण येते. हा स्टॉल चालवणाऱ्या महिला पुण्यातल्या दौंड तालूक्यातून आल्या आहेत. दुष्काळानं त्यांचं जगणं हैराण केलं, मग त्यांच्या मदतीला आल्या कमलताई परदेशी. महिला बचत गटांसाठी प्रेरणा बनलेल्या कमलताईंनी या महिलांना मुंबईचा रस्ता दाखवला. दुष्काळात खितपत राहण्यापेक्षा मुंबई शहरात आपल्या पाककलेचा व्यवसाय करण्यासाठी कमलताईंनी त्यांना मुंबईत आणलंय. "दुष्काळग्रस्त असलो म्हणजे आम्ही काय गरीब नाही," असं सांगणाऱ्या या सर्वच महिलांची स्वत:ची अशी दोन ते तीन एकर जमीन आहे. निसर्गच कोपला तिथं या बायाबापड्या तरी काय करणार ? मुंबईला येण्याची कल्पना जेव्हा मांडली तेव्हा घरातल्या पुरुषांनी त्यांना म्हटलं मुंबईत खायला खूप हॉटेल्स आहेत, मग तुम्ही बनवलेलं गावाकडचं खायला कोण येणार. मी त्यांना म्हटलं जे होईल ते होईल. मी माझ्या ओळखीच्या किराणा वाल्याकडून सोळा हजार रुपयाचा माल उधारीनं मिळवून दिला. सात हजार रुपये गाडी भाड्याला दिले आणि मुंबई गाठली. इथं ठाण्यात महाराष्ट्र व्यापारी पेठ आयोजकांना विनंती केली. हा वेगळा स्टॉल मिळाला आणि आता या महिलांचं बरं चाललंय. पहिल्या दोन दिवसात १३ हजार रुपयांचा गल्ला जमलाय. यांना दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणारी मदत नको तर हाताला काम हवंय. ते मिळालं तर दुष्काळाला त्या जुमानत नाही बघा. ते काम आवडीचं हवं, आपलं कौशल्य पणाला लावणारं हवं. घरातला स्वयंपाक करणाऱ्या या बायकांकडेही कला आहे. या कलेला वाव मिळावा म्हणून हा उपक्रम " कमलताई आनंदानं सांगत होत्या.

image


कमलताई परदेशी दौंड तालुक्यात अंबिका महिला औद्योगिक सहकारी संस्था चालवतात. तिथं त्यांनी बचतगटाच्या माध्यमातून २०० महिलांसाठी रोजगार निर्माण केलाय. या बचत गटाच्या माध्यमातून त्या तेवीस वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवतात. या मसाल्याचा स्टॉल ठाण्यातल्या महाराष्ट्र व्यापारी पेठेत लावण्यासाठी त्या मुंबईकडे निघाल्या होत्या. तेव्हाच या महिलांबद्दल समजलं, मग त्यांनाही बरोबर घ्यायचं ठरलं. 

image


" खरं तर शहरात एसी ऑफिसमध्ये बसणारी व्यक्ती गावात उन्हातान्हात मर मर काम करणाऱ्या शेतकऱ्याचं देणं लागते, असं म्हटलं तर वावगं ठरू नये कारण शेतकरी मातीत राबला तर तुम्हाला धान्य मिळेल. अन्न खायला मिळेल. तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी अन्न-धान्य डाऊनलोड करणं शक्य नाही, त्यासाठी मातीचाच आधार घ्यावा लागणार. शेतकऱ्यानं उगवलेलं धान्य आणि फळेच पोटाची भूक भागवणार. जेव्हा जेव्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा सर्वात जास्त नाडला जातो तो गावाकडचा शेतकरी. शहरातल्या लोकांना मात्र फारसा फरक पडत नाही. दुष्काळानं ग्रासलेल्या या शेतकऱ्याच्या नशिबी रस्ता बनवणे, तलाव खोदणे यांसारखी रोजगार हमीचीच कामं का यावीत, त्यालाही मानानं जगायचंय. हाताला काम मिळावं, हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही दोंड आणि शिरुरहून तीन कुटुंबातल्या महिलांना घेऊन आलोत. एका कुटुंबाला व्यापार पेठेत स्टॉल मिळवून दिला. रानमेव्याचा, शेंगदाणे चिक्की, खारे शेंगदाणे या स्टॉलवर मिळते. इतर दोघींसाठी हा वेगळा जेवणाचा स्टॉल खास मागून घेतला. आता बरं चाललंय. दुष्काळी परीस्थितीतही त्यांच्यात दडलेल्या उद्योजिकतेला प्रोत्साहित केले पाहिजे हे माझं उद्दीष्ट आहे. तेच फार महत्वाचं आहे. " कमलताई सांगत होत्या.

image


या स्टॉलकडे जास्तीत जास्त ग्राहक आणण्याचे कामही कमलताई करत आहेत. स्टेशनच्या आसपास असलेल्या कोचिंग क्लासेसना, ऑफिस कर्मचाऱ्यांना स्टॉलवर येण्यासाठी त्या आवाहन करतात. त्या म्हणतात, " खरंतर महिलांमध्ये उद्योजकता वाढली पाहिजे म्हणजे देश पुढे जाईल. पुरुष शेतात राबतो आणि जेव्हा माल घेऊन तो शहरात येतो तेव्हा ग्राहक भाव कमी करण्यासाठी घासाघीस करायला लागतो तेव्हा हा माल तयार करण्यासाठी किती रक्त आटवलंय हे त्याच्या डोळ्यासमोर येतं, तेव्हा तो ग्राहकाला,' जिथं यापेक्षा स्वस्त माल मिळेल तिथून घे' असं थेट सांगतो. महिलांमध्ये त्यांनी तयार केलेली कष्टाची वस्तू योग्य भावात विकण्याची कसब असते. त्या ग्राहकाला इथंपर्यंत येण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली याचं नेमकं गणित समजावून सांगतात, ग्राहकालाही ते पटतं आणि मालही विकला जातो. हेच तर हवंय, महिलांनी फक्त चुलीवर आणि शेतावर न राबता थेट बाजारात येऊन आपला शेतमाल विकावा."

कमलताईंच्या मते, "महिलांचं व्यवहार ज्ञान कमालीचं असतं. त्या आपल्या कमाईतला किंवा मिळालेल्या पैश्याचा योग्य विनिमय करतात." कमलताईंशी बोललं की मॅनेजमेन्टच्या क्लासमध्ये बसल्या सारखं वाटतं. आपल्या व्यवहारी वक्तव्यानं त्या आसपासच्या व्यक्तींवर त्या शब्दांची जादू करतात. 

image


आता पुढच्या दोन महिन्यात दुष्काळी भागातल्या महिलांसाठी मुंबई आणि आसपासच्या भागात जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी कमलताई प्रयत्न करणार आहेत. " दुष्काळी भागातून आलो म्हणजे फक्त दगडविटा उचलण्याचं काम नाही करु देणार यांना. हे नैसर्गिक संकट आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी अशी कामंच करावी. त्यांना जे येतं ते करु द्या. यांना दया किवा फक्त मदत नकोय. त्यांना काम देऊन त्यांचा सन्मान राखा. या सन्मानासाठीच मी प्रयत्न करत राहणार आहे" कमलताई निर्धारानं सांगत होत्या. त्यांचे डोळे आत्मविश्वासानं आणखी चमकत होते. 

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

बनारसमध्ये भीक मागणाऱ्या स्त्रियांना आत्मनिर्भर बनवले परदेशातील भगिनींनी 

आजपर्यंत ज्या सावकारांकडून कर्ज घेत होत्या, आज त्याच महिला सावकारांना देत आहेत, कर्ज! 

तीन अशिक्षित महिलांना उभारली करोडोंची कंपनी, १८ गावातील ८००० महिलांना बनविले स्वावलंबी