दलित समाजातील हरहुनरी उद्योजक रतिलाल मकवाना यांच्या अफाट उद्यमितेची कहाणी!
रतिलाल मकवाना एक हजार कोटींच्या साम्राज्याचे मालक आहेत, त्यांची गणती देशातील सर्वात मोठ्या उद्योजकांमध्ये होते. सध्याच्या काळात त्यांची गणना आघाडीचे दलित उद्यमी म्हणूनही होत आहे. त्यांच्या यशाची कहाणी प्रेरणादायक अशीच आहे.रतिलाल यांनी त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत, स्वातंत्र्योत्तर काळातील देशातील सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक परिवर्तनाचे ते साक्षीदार आहेत. रतिलाल यांच्या जीवनात अस्पृश्यता, जातीय भेदाभेद, सामाजिक बहिष्कार, आणि असहकार्याच्या प्रसंगांचा अनुभव घेतला आहे. दलित असल्याने त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला होता, हॉटेलमध्ये दलितांना राखून ठेवलेल्या भांड्यातून जेवण देण्यात आले. नवे कपडे घातल्यास टोमणे मारण्यात आले. लहानपणी आणि तरुणपणात त्यांना ती कामे करावी लागली जी केवळ मागासवर्गीयाना परंपरेने करावी लागत होती. परंतू आपल्या वडील आणि आजोबा यांच्याकडून मिळालेल्या व्यावसायिक शहाणपणाने त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. आपल्या कुशाग्र बुध्दीमत्ता आणि मजबूत मनाच्या माध्यमातून त्यांनी पंरपरागत व्यवसायात नव्या उंचीला जाण्याचा पराक्रम केला आणि हेच दाखवून दिले की कोणताही व्यवसाय हा हिन दर्जाचा नसतो. जातीच्या आधारे त्याला उच्च किंवा नीच ठरविता येत नाही. रतिलाल यांनी मोठ मोठ्या लोकांना हे म्हणण्यास भाग पाडले की चामडे काळे सोने असते त्यात नफा कमविला जावू शकतो.
त्यांच्या या प्रेरक कहाणीची सुरुवात गुजरात मध्ये झाली. भावनगर येथे एका दलित परिवारात १९४३मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण दलित समाजाला देण्यात येणा-या भेदभावपूर्ण वातावरणात गेले. हा तो काळ होता ज्यावेळी जातीय भेदाभेद तीव्र होता. त्या काळाच्या आठवणी ते आजही सांगतात. आजही त्यांना ते लहानसे घर आठवते जेथे त्याचे कुटूंब राहात होते. त्यांना त्यांचे शाळेतील दिवसही आठवतात. त्यांना आठवते की, दलित असल्याने त्याना मंदीरात जायला मनाई करण्यात येत असे. भावनगर मध्ये प्रसिध्द असलेल्या खोडियार माता मंदीरात दलितांना प्रवेश नव्हता. त्यांच्यासाठी मंदीराबाहेर वेगळी प्रतिमा लावण्यात येत असे दलित मग त्याच मुर्तीची पूजा अर्चना करत असत. त्यांना नवस करायचा असेल तरीही त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता.
रतिलाल सांगतात की, त्यांना शहरात केस कापायलाही जावु दिले नव्हते. त्यांचे केसही वेगळा न्हावी कापत असे, त्याच्याकडून सवर्ण लोक केस कापून घेत नव्हते. दलितांना हॉटेलमध्ये प्रवेश नव्हता. त्यांनी स्पर्श केलेल्या भांड्याला कुणी स्पर्श करत नव्हते. रतिलाल यांनी सांगितले की, ते सरकारी शाळेत जात असत तेथेही भेदभाव केला जात होता. या सा-यांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ते सांगतात, “मला खूप वाईट वाटे. आमच्याशी असे का वागले जाते ते समजत नसे. आम्ही सुध्दा माणसे आहोत मग मंदिरात का जावू दिले जात नाही. हॉटेलात खाऊ दिले जात नाही,आम्ही दुस-यां सारखे नवे कपडेही घालू शकत नाही”.
रतिलाल यांना १९५२ची ती घटना आठवते, ज्यावेळी भावनगर मध्ये सर्व दलितांनी मोर्चा काढला आणि मंदिरात प्रवेश केला आणि हॉटेलातही खायला गेले. रतिलाल सांगतात की, स्वातंत्र्याच्या काळानंतर हळुहळू सुधारणा झाल्या मात्र भेदभाव संपला नाही. स्वातंत्र्यांच्या ब-याच वर्षांनंतरही दलितांना नोकरी दिली जात नव्हती. त्यांच्याकडून मजुरी करुन घेतली जात होती, त्यात सारी सवर्णाच्या दृष्टीने घाण समजली जाणारी कामे होती. त्यांनी सांगितले की, त्यांच्या आजोबांना सुरेंद्र नगर जिल्ह्यात राणापूर गावात एका युरोपिअन जिनींग कंपनीत नोकरी मिळाली होती. विदेशी कंपन्याच दलिताना नोक-या देत असत. विटल ऍण्ड कंपनीमध्ये रतिलाल यांच्या आजोबांना ब्रायलर अटेंडंट म्हणून नोकरी मिळाली. त्या निमित्ताने त्यांच्या आजोबांना अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यातून ओळखी होत होत्या आणि त्यांना रोज नवे काहीतरी शिकायला मिळत होते. लोकांशी बोलता बोलता त्यांच्या मनात व्यवसाय करण्याचा विचार आला. त्यावेळी रतिलाला यांचे आजोबा त्या कुटूंबात पहिले असे व्यक्ति होते की ज्यांचा व्यवसाय होता. त्यांनी जनावरांच्या कातडी आणि हाडे विकण्याचा व्यवसाय केला, मात्र काही दिवसांनी हा व्यवसाय बंद झाला. कारखान्यात काही समस्या आल्याने त्यांचा हा व्यवसाय बंद झाला. रतिलाल सांगतात की, त्यांचे आजोबा शिक्षित नव्हते मात्र त्यांनी व्यवसायातील बारकावे शिकून घेतले होते. बॉन कारखान्यात काम बंद झाल्यावर त्यांनी कराची बंदरात जावून जहाजाचे सामानही विकले.
रतिलाल यांचे वडील आधी शेतात मजूरी करत असत. काही वर्ष हे काम केल्यावर ते भावनगरला आले आणि पिकर बनविण्याचे काम सुरु केले. जिनिंग फँक्ट्रीमध्ये पिकरचा उपयोग पॉवरलुम कपडा बनविण्यासाठी केला जात असे. ते म्हशीच्या चामड्यापासून बनवितात. त्याकाळी हे काम करण्यास इतर समाजाचे लोक तयार नसत. दलित असल्याने मकवाना परिवार हे काम करत असे. काम तर सुरु केले मात्र अडचण अशी होती की, त्यासाठी जमिन मिळणे कठीण होते. भावनगर राजा कृष्णकुमारसिंहजी यांची रियासत होती. रतिलाल यांच्या वडिलांनी ऐकले होते की ते खूप दयाळू आणि मदत करणारे व्यक्ति आहेत. त्यांना वाटले की ते त्यांची मदत करतील. मात्र अडचण अशी होती की मदतीची याचना कशी करावी. दलित असल्याने राजाच्या दरबारात जाणे सोपे नव्हते. मात्र त्याचवेळी त्याच्या वडिलांच्या मनात विचार आला की, त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरमार्फत त्यांना मदत मागावी.
मकवाना परिवार त्याकाळी जनावरांचा चारा विकण्याचेही काम करत असे त्यामुळे राजाच्या गाडीच्या ड्रायव्हरशी त्यांचा परिचय होता. कारण घोड्यांसाठी चारा तो त्यांच्याकडून घेत असे. एक दिवस रतिलाल यांचे वडील गालाभाई यांनी राजाच्या ड्रायव्हराला आपली समस्या सांगितली. ड्रायव्हरने सांगितले की जेंव्हा तो राजाला घेवून बाहेर जाईल तेंव्हा त्यांनी बाहेर थांबून त्याला हात हलवून दाखवावा आणि तो गाडी थांबवेल. त्याने सांगितले की गाडी थांबताच त्यांनी पटकन समोर येवून म्हणणे सांगावे. योजने नुसार दिवस आणि वेळ ठरला. आणि ठरल्याप्रमाणे सारे काही झाले, रतिलाल यांच्या वडिलांनी राजासमोर म्हणणे मांडले, पिकरचे काम करण्यासाठी जमीन मागितली. आपल्या स्वभावनुसार राजाने ही गोष्ट मान्य केली आणि दुस-या दिवशी दरबारात येण्याचा हुकूम केला. दुस-याच दिवशी राजाने मोफत जमीन देण्याचा आदेश दिला. अशाप्रकारे मकवाना परिवाराच्या उद्योगाची उभारणी झाली.
कपड्याच्या कारखान्यात पिकर विदेशातून येत असे तो भारतात बनत नसे. दुस-या महायुध्दनंतर तो भारतात येणे बंद झाले होते. त्याच्याशिवाय मिल चालणे कठीण होते. त्यामुळे देशात पिकर बनविण्याचे काम सुरु झाले होते. पिकर म्हशीच्या चामड्यापासून तयार होत असल्याने त्याचा व्यवसाय दलित समाज वगळता अन्य समाज करत नसे. तो शहरातही केला जात नसे रतिलाल यांच्या वडिलांना वाटले की राजाने त्यांना कुठेतरी गावाबाहेर जमीन दिली तर ते मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करतील. राजाने जमीन दिली त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रामाणात हा व्यवसाय सुरु केला. त्यांनी बनविलेल्या पिकर मुंबई, कोलकाता, बंगळुरु, बडोदा, भिवंडी, सुरत येथे विकल्या जावू लागल्या. महत्वाचे म्हणजे रतिलाल यांचे वडील पिकर बनविण्याच्या कामी तेल आणि चामडे विदेशातून आयात करत असत. त्यासाठी खास प्रकारच्या व्हेल माश्याच्या तेलाचा वापर केला जात असे. हे तेल ते इंग्लड आणि नॉर्वेमधून मागवित होते. चामडे थायलंड, हॉंगकॉंग, आणि सिंगापूर येथून मागवत होते.
दुस-या महायुध्दामुळे भारतात पिकर येणे बंद झाल्याने रतिलाल यांच्या वडिलांना त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी संधी होती. भावनगरच्या राजाने मदत केल्याने हा व्यवसाय सुरू झाला होता, अनेक वर्ष काम चांगले सुरु होते. त्यावेळी ते हाताने पिकर मशीन चालवित होते, मात्र त्यांनी विचार केला की यांत्रिक पध्दतीने काम केले तर वेग वाढेल, व्यवसाय वाढविण्यासाठी स्वयंचलित यंत्रे आवश्यक होती. मात्र त्यासाठी लागणारे भांडवल त्यांच्याजवळ नव्हते. ते बँकेतून कर्ज घेवू इच्छित होते, मात्र बँक अधिका-याने कर्ज देण्यास स्पष्ट नकार दिला होता. तेथेही जातीवाद होता त्यामुळे अधिकारी तयार नव्हते. रतिलाल सांगतात की, “ वडिलांनी अनेकदा अर्ज केला मात्र कुणी कर्ज दिले नाही. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र जी पूर्वी दरबार बँक या नावाने ओळखली जात असे, त्या बँकेचे अधिकारी नागर ब्राम्हण होते आणि त्यामुळे ते कर्ज देण्यास तयार नव्हते. कारण त्यांनी कर्ज दिले असते तर त्यांना कागदावर चामडे हा शब्द लिहावा लागला असता. जे त्यांच्या मते पाप होते. त्यामुळेच आम्हाला कर्ज मिळत नव्हते”.
मात्र भावनगरमद्ये झालेल्या एका मोठ्या घटनेनंतर रतिलाल यांच्या वडीलांना बँकेत कर्ज मंजूर झाले. त्यांनी सांगितले की, १९५५मध्ये केंद्रीय मंत्री टी कृष्णम्माचारी भावनगरच्या दौ-यावर होते. त्यांनी जिल्हाधिकारी यांना पाच प्रकारच्या कारखान्यांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. जिल्हाधिकारी यांनी त्या पाच मध्ये रतिलाल यांच्या वडीलांच्या काराखान्याची निवड केली होती. ज्यावेळी मंत्री पिकरच्या कारखान्यात आले तर त्यांनी काही समस्या आहेत का विचारले. गालाभाई यांनी कर्जाची समस्या असल्याचे सांगितले. मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले की त्यांनी बँकेत जावून सागावे की हे पिकर नाही काळे सोने आहे, त्यांनतर कर्ज मंजूर झाले आणि त्यांनी स्विझर्लंडहून पिकर तयार करणा-या स्वयंचलित यंत्राची मागणी केली. त्यांनतर व्यवसाय वेगाने वाढला. त्यातून नफाही वाढत गेला.
मात्र काही कारणाने मकवाना यांच्या कुटूंबात वाटण्या झाल्या. रतिलाल यांचे वडील गालाभाईतांचे सहा भाऊ होते, सारे प्रथम कारखान्यात काम करत होते. मात्र वाटण्या झाल्यावर सारे वेगळे होवून काम करु लागले. रतिलाल यांच्या वडीलांनी त्यांच्या उद्योगाचे नाव गुजरात पिकर इंडस्ट्रिज ठेवले, केवळ पन्नास हजारांच्या भांडवलांत नवी सुरुवात झाली. रतिलाल यांचे वडील अनुभवी असल्याने पहिल्या वर्षातच त्यांनी दोन लाखांची उलाढाल केली, प्रचंड मेहनत करत त्यांनी व्यवसाय वाढविला. मात्र तरीही समस्या काही संपत नव्हत्या संघर्षाचे दिवस सुरुच होते.
वाटण्या झाल्यावर एकट्याने काम करताना रतिलाल यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली. त्यांना मदत करताना रतिलाल यांनी शिक्षण सोडून दिले. सहाव्या वर्गापर्यंत त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांनतर त्यांनी सातवीसाठी सनातन धर्न हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. तेथील शिक्षक चांगले शिकवत असत असे ते सांगतात. याच शाळेत रतिलाल यांना विज्ञान या विषयाची गोडी लागली. त्यांना अभियंता व्हायचे होते मात्र घरच्या वाटण्या झाल्यावर त्यांचे स्वप्न भंगले होते. वडिलांना मदत करावी म्हणून ते काम करु लागले त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. लहान वयातच त्यांनी पिकर कारखान्यात काम सुरु केले. रतिलाल भावनगरमध्ये पिकर बनविण्याचे काम बघत होते तर त्यांचे बंधू झाला भाई देशात वेगेवेगळ्या गावी जावून वितरण आणि पुरवठा यांचे काम करत होते. मुले आणि वडील यांनी व्यवसाय खुप चांगला केला.
एका प्रश्नाला उत्तर देताना रतिलाल म्हणाले की, “ जर मी वडीलांना मदत केली नसती तर व्यवसाय बंद होणार होता. ते एकट्याने सारी कामे पाहू शकत नव्हते. भांवडे लहान होती त्यामुळे केवळ मीच त्यांना मदत करू शकत होतो”. ते निसंकोचपणे सांगतात की, “ त्यावेळी मी शिकलो असतो तर या पेक्षा मोठा व्यवसाय करू शकलो असतो,पण शाळा सोडण्याचा निर्णय केवळ माझा नव्हता वडिलांची देखील ती इच्छा होती की मी त्यांना मदत करावी”.
रतिलाल वडील गालाभाई यांच्या कडून बरेच काही शिकले आहे ते म्हणाले की, भावनगरमध्ये त्यांच्या वडिलांनी अनेक प्रकारची कामे केली होती. भावनगरच्या राजाने जपानच्या मदतीने रबर तयार करण्याचा कारखाना सुरु केला होता. रतिलाल यांच्या वडीलांना या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांचा जपानी लोकांशी सरळ संपर्क आला होता. त्यांच्याकडून त्यांना बरेच काही शिकण्यास मिळाले होते त्यातून त्यांच्या मनात अनेक कल्पना आल्या होत्या. त्यांच्या वडिलांनी राणापूरच्या गुजराती पत्रकार आणि साहित्यिक झवेरचंद मेघाणी याच्या वर्तमान पत्राच्या छापखान्यातही काम केले होते. त्यांनी चारा विकला आणि पिकरही विकले होते. त्यासाठी त्यांचे देशभर फिरणे सुरु होते.
रतिलाल यांनी सांगितले की त्यांचे वडील चारा विकत त्यावेळी भावनगरच्या राजा शिवाय गोंडलच्या राजांच्या जनावरांसाठी देखील ते विकत असत. त्यात चारा नेणा-या मजूरांनी बदमाशी केली आणि चारा नेताना त्यात माती घालून नेला. राजाला हे समजले त्यावेळी नाराज होवून त्यांनी गालाभाई यांना दरबारात बोलावले. तेथे जावून त्यांनी सत्य कथन केले आणि पुन्हा चारा पाठवून देण्याचे वचन दिले त्यावर राजाने मान्यता दिली. रतिलाल म्हणाले की, “ते धाडसी होते, त्यांचा अनुभव मोठा होता, त्यांनी मेहनत आणि प्रामाणिकता यांतून बरेच काही शिकवले होते”. रतिलाल यांचे वडील एका ख्रिस्ती माणसाच्या घरी राहून दोन वर्गापर्यंत शिकलेले होते. आपल्या मुलांना शिक्षण द्यावे असे त्यांना वाटले होते मात्र घरच्या स्थितीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. रतिलाल यांच्या वडिलांनी तसे असले तरी व्यवसायातील बारकावे मुलांना शिकवले होते. १९६५मध्ये विदेशी मुद्रा समस्या निर्माण झाली होती त्यावळी केंद्र सरकारने ठरविले होते की तेहतीस टक्के प्रिमीयम जमा करणा-यांना आयात करण्याचा परवाना दिला जाईल. विदेशात चामडे स्वस्त होते तर भारतात ते महाग होते. रतिलाल यांचे वडील त्यावेळी वाचले होते कारण त्यांनी आधीच जुन्या दराने मुंबईच्या व्यापा-यांकडून चामडे घेतले होते. रतिलाल यांनी त्यावेळी शहाणपणाने काम केल्याने त्यांच्या वडीलांना फायदा झाला होता. १९६७मध्ये त्यांचे वडील इंग्लडमधून हायड्रोलिक मशीन आण ण्याचा विचार करत होते.परंतू सरकारच्या आयात कराच्या धोरणामुळे ती महाग पडणार होती. रतिलाल यांनी त्या यंत्राचे आराखडे मागविले आणि तसेच यंत्र भारतात तयार केले. त्यातून त्यांच्या वडीलांची बचत झाली आणि नव्या यंत्रामुळे व्यवसायात वाढ झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे रतिलाल यांचा आत्मविश्वास त्यातून वाढला.
१९७१मध्येही अश्याच काही घटना झाल्या त्यातून रतिलाल यांच्या व्यावसायितकेचा परिचय झाला. त्यावेळी त्यांना मध्यरात्री थायलंड येथून तार आली, की तेथील सरकारने चामड्यावर कर वाढविला आहे. त्यांनी तेथे तीस मेट्रीक टन मागणी नोंदविली होती. ही चांगली बातमी नव्हती. कर वाढल्याने चामड्याची किमंत दुप्पट झाली होती. त्यांनी वेळ न घालविता मलेशिया सिंगापूर हॉंगकॉंग येथून कोटेशन मागविले. तार करून मागणी नोंदविली. त्यात त्यांनी ८० टन चामडे मागविले. तेथे ही दरवाढ झाल्याची माहिती नव्हती. महत्वाचे म्हणजे थायलंड पाठोपाठ त्यांनी देखील करवाढ केली. मात्र त्यापूर्वीच रतिलाल यांनी मागणी नोंदवून टाकली होती त्यामुळे त्यांना नुकसान झाले नाही. त्यात त्याना चार लाख रुपयांचा फायदा झाला होता ही रक्कम त्यांच्या वर्षभराच्या कमाई इतकी होती. त्यातून त्यांना व्यवसाय वाढविण्यासाठी फायदा झाला होता.
रतिलाल यांच्यात वैशिष्ट्य असे की त्यांना संधी लगेच समजते आणि त्याचा तातडीनं फायदा कस घ्यायचा हे ते जाणतात. त्यामुळे योग्यवेळी त्यांनी दुस-या व्यवसायात देखील काम सुरु केले. पिकर चा व्यवसाय फार काळ सुरु राहणार नाही हे समजले त्यावेळी त्यांनी प्लास्टिकच्या पिकर व्यवसायात आणल्या. चामड्याच्या पिकर पेक्षा प्लास्टिकच्या पिकरमध्ये जास्त नफा होता. योग्यवेळी त्यानी त्यात सुरुवात केली त्यातून त्यांच्या व्यवसायाची दशा आणि दिशा बदलून गेली.
रतिलाल म्हणाले की, भावनगरमध्ये जेथे त्यांचा कारखाना होता त्याच्या बाजुला प्लास्टिकच्या दो-या तयार करणारे कारखाने सुरु झाले होते. त्यासाठी लागणारा कच्चा माल मफतलाल ही एकमेव कंपनी तयार करत होती. त्यामुळे त्यांचा पुरवठा कमी होता. त्यामुळे बाजारात टंचाई झाली की कच्चामाल विदेशातून मागवावा लागे. बाजारात हाय डेंसिटीच्या प्लास्टिकची किंमत जास्त होती. त्याचवेळी १९६८मध्ये गुजरातच्या बडोदा येथे आयपीसीएल ने एक कारखाना सुरु केला होता. त्यांनी जाहिरात दिली की वितरक हवे आहेत, रतिलाल यांना त्यात संधी दिसली. त्यांनी पूर्वानुभव नसताना अर्ज केला. त्यामागे केवळ रस्सी बनविणा-यांनी दिलेल्या तांत्रिक माहितीचा आधार होता. त्यांच्या व्यतिरिक्त भावनगर येथील आणखी दोघे या स्पर्धेत होते, एक उच्चवर्णिय व्यापारी आणि एक प्लास्टिकच्या रस्सी बनविणारी सोसायटी. रतिलाल यांना माहिती होते की या स्पर्धेत ते कमजोर खेळाडू आहेत कारण त्यांच्याकडे बँकहमी नव्हती. किंवा या क्षेत्रात काम करण्याचा कोणताही अनुभव नव्हता. अर्ज केल्यावर त्याबाबत चौकशी करण्यासाठी ते बडोद्याला कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथील बाजार व्य़वस्थापकाने त्यांना सांगितले की, अर्जाची छान नी करण्यासाठी अधिकारी भावनगरला येतील. मात्र दोन महिने झाले तरी कुणी अधिकारी तपासणीसाठी येईन त्यावेळी त्यांना संशय आला. त्यांनी त्यावर विचारणा करण्यासाठी त्यांचे मित्र आणि खासदार प्रसन्नवदन मेहता यांची मदत घेण्याचे ठरविले. मेहता यांनी त्यावेळचे मंत्री हेमवतीनंदन बहुगुणा यांना पत्र पाठविले. त्यात मंत्र्यांच्या कार्यालयातून उत्तर आले की रतिलाल याचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. त्याचे कारण देण्यात आले की त्यांच्या जवळ पुरेसा अनुभव नाही. त्यांनी खासदारांना हे समजावून दिले की त्यांना प्लास्टिक पिकर तयार करण्याचा अनुभव आहे आणि त्याचे काम जागतिक दर्जाचे आहे. त्यांचे म्हणणे ऐकून खासदार मेहता यांनी त्यांना दिल्लीत जावून मंत्री बहुगुणा यांच्यासमोर हे सारे मांडण्यास सुचविले. रतिलाल त्यानुसार दिल्लीत गेले त्यांनी मंत्री बहुगुणा यांना अर्ज रद्द झाल्याचे सांगितले त्यावर ते चिडले त्यांनी सांगितले की मी अर्ज बघत नाही, मात्र खासदार मेहता म्हणाले की, चुकीच्या कारणाने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. त्यावर मंत्र्यांनी त्यांना तक्रार अर्ज देण्यास सांगितले. त्याच वेळी त्यांना उत्तरप्रदेशात आमदार असलेल्या एका मित्राची आठवण झाली. त्यांना भेटायला ते लखनौला गेले मात्र भेट होवू शकली नाही. त्याचवेळी त्यांना समजले की तेथे बाबू जगजीवनराम यांची सभा होती, तेथे जावून त्यांनी जगजीवनराम यांना आपले निवेदन दिले. त्यावेळी बाबू जगजीवनराम दलितांचे मोठे नेते होते. त्यांनी आयपीसीएलला पत्र पाठविण्याबाबत आश्वासन दिले. त्यांनतर त्यांनी पुन्हा आमदार मित्राला फोन लावला तर समजले की ते अलाहाबादला आहेत, त्यांना भेटण्यासाठी रतिलाल रवाना झाले, मित्राने सांगितले की त्याची ओळख मंत्री बहुगुणा यांच्या पत्नी सोबत आहे त्यामुळे त्यांना हे सारे ते सांगतील त्यावर दोघे कमल बहुगुणा यांना दिल्लीत जावून भेटले, त्या स्वत: देखील खासदार असल्याने त्यांनी देखील रतिलाल यांची शिफारस करणारे पत्र दिले. मात्र त्याच दरम्यान मोरारजी देसाई यांचे सरकार पडले. चरणसिंह पंतप्रधान झाले आणि तीन अर्जदारांना बाजुला करत आयपीसीएल ने चवथ्याच कंपनीला गुजरात लघु उद्योग व्यापार मंडळाला काम दिले.
परंतु रतिलाल थांबले नाहीत त्यानी त्यावेळचे खासदार योगेद्र मकवाना यांची मदत घेतली, त्यांची ओळख आयपीसीएलच्या संचालक वेंकट सुब्रमण्यम यांच्याशी होती. मकवाना यांनी चर्चा केली त्यावर सुब्रमण्यम यांनी स्पष्टपणे नवे सरकार आल्यानंतर निर्णय घेता येईल असे सांगितले. मात्र सुब्रमण्यम यांनी रतिलाल यांना सल्ला दिला की त्यांनी ऐजंसी घेण्यापेक्षा प्लास्टिक बँग तयार करण्याचे काम सुरु करावे. केंद्रातील राजकीय अस्थिरता असल्याने रतिलाल याचे वर्ष वाया गेले होते. रतिलाल यांनी सल्ला ऐकला नाही आणि अडून बसले की ऐजंसीच हवी. त्यांनतर इंदिरा गांधी यांचे सरकार आले त्यात योगेंद्र मकवाना केंद्रीय गृहराज्यमंत्री झाले, रतिलाल यांनी त्यांना पुन्हा संपर्क केला. मकवाना यांनी त्यावेळी आयपीसीएलचे अध्यक्ष वरदराजन यांना रात्री एक वाजता फोन केला. मात्र वरदराजन यांनी सांगितले की रतिलाल यांचा अर्ज बाद करण्याचा निर्णय त्यांचा नाहीतर मंडळाचा होता. त्यांनतर मकवाना यांनी मंडळाची बैठक घ्यायला लावली आणि ऐजंसी रतिलाल यांना विशेष बाब म्हणून देण्यास भाग पाडले. रतिलाल यांच्या जिद्दीच्या समोर सर्वाना झुकावे लागले. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यावेळी आयपीसीएलच्या दोन एजंसी झाल्या होत्या. त्यांच्या एजंसीच्या शुभारंभावर अनेकांनी बहिष्कार घातला होता. त्यातून पुन्हा जातीय समीकरणे दिसू लागली होती. मात्र बहिष्कार झाला तरी हिंमत न हारता रतिलाल यांनी कमी किमंतीत कच्चा माल विकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडील कच्चामाल वापरताना उद्योजकांना त्यातील बाराकावे समजले की त्यातून मजबूत रस्सी कमी खर्चात तयार करता येते. त्यावेळी त्यांनी पीवीसी चादर, टेप तयार करत प्लास्टिक उद्योगाचा चेहराच बदलून टाकला. शेकडो मजूरांना काम मिळाले त्यात बहुतांश दलित होते. रतिलाल यांच्या गुजरात पिकर्स इंडस्ट्रीजने चांगली कामगिरी करत दोन तीन वर्षात आघाडीच्या दहा कंपन्यात नाव मिळवले. १९८६मध्ये कंपनी देशातील दुस-या क्रमांकाची वितरक कंपनी झाली. त्यानंतर १९८ ८मध्ये कंपनीला पूर्ण गुजरातमध्ये माल विकण्याचा परवाना मिळाला. हे सारे सोपे नव्हते मात्र जिद्द आणि व्यावसायिक समज दाखवत रतिलाल यांनी ते शक्य करून दाखवले होते.
गुजरात पिकर्सचा नफा वाढला त्यावेळी पुन्हा रतिलाल यांनी विस्ताराची योजना तयार केली १९९२मध्ये त्यांनी रेनबो पँकेजिंग लि. खरेदी केली. रतिलाल यांच्याकडून कच्चा माल घेवून ते दुध पँकिंगसाठी लागणारे पॉलिथिन तयार करत होते. १२ राज्यातील सरकारी डेअरीला हा माल जात होता, त्यांनतर हे काम रतिलाल यांनी सुरु केले.
सन २००२मध्ये रतिलाल यांना जोरदार धक्का बसला वाजपेयी सरकारने सरकारी कंपन्यातील खाजगीकरणाचा निर्णय घेतला त्यात आयपीसीएलचा क्रमांक होता. कंपनी विकण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. बोलीच्या आधारावर कंपनीचा एक भाग रिलांयन्सला मिळाला. नव्या व्यवस्थापनाने रतिलाल यांची वितरक म्हणून उचलबांगडी केली. ती टिकवण्याचा रतिलाल यांनी खुप प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. रिलायंन्स समुहाच्या अधिका-यांशी बोलताना त्यांचा अनुभव चांगला नव्हता.
रतिभाई यांच्यात चांगल्या उद्यमीचे सारे गुण आहेत मात्र ते नव्याने काहीतरी करण्याचा सतत विचार करतात आणि त्यासाठी जोखीम घेण्यास तयार असतात हा खास गुण आहे. त्याच गुणाने त्यांनी व्यवसाय आफ्रिकापर्यत नेला. त्यातूनच त्यांनी २००७मध्ये आफ्रिकेत युगांडा येथे साखर कारखाना सुरु केला. ते देखील संघर्षातून मार्ग काढत काम सुरु झाले असे ते सांगतात. या क्षेत्रात मेहता आणि माधवानी या दोन मोठ्या उद्योगपतींचा कब्जा होता. ते नव्या लोकांना या क्षेत्रात टिकून देत नसत. मात्र रतिलाल यांनी गुळ तयार करण्याचे काम करत या क्षेत्रात प्रवेश केला. ज्यावेळी त्यांनी प्रथम साखर तयार केली त्यावेळी ते या दोन उद्योजकांच्या स्पर्धेत आले. या दोघांनी त्यांच्यावर दबाव आणला की त्यांनी हा व्यवसाय बंद करावा. रतिभाईनी माहिती घेतली होती या व्यावसायिकांचे गुजरात मध्येही व्यवसाय होते. राजकीय मित्रांच्या मदतीने रतिभाई यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला की त्यांनी साखर उद्योगात त्रास देवू नये. त्यामुळे आजही आफ्रिकेत रतिभाई व्यवसाय करत आहेत आणि त्यात विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
सध्या त्यांचे चार मुलगे- राजेश, गौतम, चिराग, आणि मुकेश त्यांना मदत करतात. सध्या त्यांच्या समुहाची वार्षिक उलाढाल ८००ते हजार कोटी रुपयांची आहे. रतिलाल यांनी गेल इंडिया आणि नंतर इंडियन ऑइल यांची एजंसी घेतली, दोन्ही मध्ये चांगला नफा त्यांना मिळतो याशिवाय दुध पाकीटे बनविण्याच्या धंद्यात त्यांना जास्त नफा मिळतो आहे. रतिलाल विदेशातून पेट्रोकेमिकल आयात करुन विकण्याचाही व्यवसाय करतात. त्यांच्या खास रणनितीनुसार वेगेवगळ्या क्षेत्रात ते विस्तार करत आहेत.
सध्या ते गुजरात दलित चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रमुख आहेत. जास्तीत जास्त दलितांना उद्योगात मदत करण्यासाठी ते कोणतीही कसर ठेवत नाहीत. त्यासाठी नियमीत कार्यशाळा, परिषदा सुरु असतात. ते सांगतात की , “ दलित म्हणून मी जो भेदाभेद सहन केला तसे कुणा इतरांना भोगावे लागू नये हाच माझा प्रयत्न असतो”
एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ज्यावेळी या व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल टाकले होते त्याच वेळी निश्चय केला होता की, विदेशात जावून खूप विस्तार करायचा. त्यासाठी १९६५मध्येच त्यांनी पारपत्र तयार केले होते. आणि पुढे जावून आपले स्वप्न पूर्ण केले. सुरुवातीला त्यांच्याकडे पैसे नसल्याने विदेशी तंत्रज्ञान देशात आणुन काम करण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही मात्र कर्ज काढून आवश्यक सामुग्री देशात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यासाठी युनि अन बँक आणि दरबार बँकेच्या व्यवस्थापकांनी त्यांना मदत केली. त्याशिवाय त्यांना कुणी मदत केली नाही.
ते मान्य करतात की हजार कोटीच्या साम्राज्याचे ते मालक होतील असे त्यांनी स्वप्न पाहिले नाही. ते सांगतात की, “ जे मिळवले आहे त्याने मी समाधानी आहे. आता मला समाजासाठी काही करायचे आहे.” ते समजतात की, जोवर दलितांबाबत समाजाची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. ते म्हणतात की, “ जातीय भेदाभेद पहिल्या पेक्षा कमी जरुर झाला आहे मात्र अजूनही खूप काही करणे बाकी आहे. गुजरातसारख्या विकसित राज्यातही बहिष्कार आणि अस्पृश्यता आजही आहे अश्यावेळी मागास राज्यात काय स्थिती असेल त्यांचा अंदाज येवू शकेल.”
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे उद्योजकतेच्या प्रेमापोटी रतिलाल राजकारणापासून दूर राहिले आहेत. त्यांना एकदा राज्यसभा सदस्यत्वाचा प्रस्ताव आला होता. मात्र त्यांनी राजकारणापासून दूर राहणे योग्य असल्याचा निर्णय घेतला होता. रतिलाल याची कहाणी केवळ व्यवसाय करणा-यासांठीच नाही तर सर्वसामान्यासाठी देखील प्रेरक कहाणी आहे. ते सांगतात की, कोणतेही आव्हान असो न घाबरता त्याचा सामना केला पाहिजे. जेथे प्रश्न असतात तेथेच संधी दडल्या असतात त्यातूनच यश साधता येते. असेही नाही की रतिलाल यांना केवळ फायदाच होत राहिला दोन वेळा त्यांच्या जीवनात मोठे धक्के बसले. ९०च्या दशकात त्यानी बंदर जहाज तोडणी उद्योगात काम करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अलंग नावाच्या बंदरात हे काम चाले. त्याच काळात डॉलरचे भाव वरखाली येत असत, त्याचा प्रतिकूल परिणाम जहाज तोडणी उद्योगावर झाला, सर्वाप्रमाणे रतिलाल यांनाही नुकसान झाले. त्यामुळे त्यांना हा व्यवसाय सोडून द्यावा लागला.
१९९४मध्ये रतिलाल यांनी मोठी पब्लिक लिमिटेड कंपनी सुरु केली, महुआ मध्ये पोलाद कारखाना सुरु केला. त्यासाठी बँकेतून १५ कोटीचे कर्ज घेतले मात्र सारे पैसे संपले, त्यांच्या मते त्यांनी भागीदारावर या उद्योगाची जबाबदारी सोपविली होती. ते गुजरात मध्ये होते त्यामुळे त्यांना नीट लक्ष देता येत नव्हते त्यांना इतर उद्योगातही लक्ष द्यायचे होते त्यामुळे त्यांना या उद्योगात लक्ष देता येत नव्हते. भागीदाराच्या चुकीच्या कामामुळे हा उद्योग तोट्यात गेला आणि बंद करावा लागला होता. त्यातून नुकसान झाले ते भरून काढायला खूप वेळ गेला.आयुष्यातील हा खूप मोठा धडा ते मानतात.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.