Brands
Discover
Events
Newsletter
More

Follow Us

twitterfacebookinstagramyoutube
ADVERTISEMENT
Advertise with us

स्ट्रीट फॅशनला ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देणारे 'स्ट्रीटबाजार.इन'

स्ट्रीट फॅशनला ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देणारे 'स्ट्रीटबाजार.इन'

Wednesday January 20, 2016 , 3 min Read

ज्या कोणाला रस्त्यावर किंवा रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये खरेदी करायला आवडत नाही तसेच ज्या कोणाला अशा बाजारांमध्ये खरेदी किंमतीत घासाघीस करता येत नाही, अशा सर्वांना आता हा अनुभव घरबसल्या मिळणार आहे. हा अनुभव घेण्यासाठी त्यांना खास बाजारात किंवा वर्दळीच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. हे सर्व आता ' Streetbazaar.in' (स्ट्रीटबाजार.इन) या संकेतस्थळावर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला रस्त्यालगत असलेल्या दुकानांमधील फॅशनेबल कपडे उपलब्ध होणार आहेत. भारतीय फॅशनला प्रोत्साहन देणे तसेच स्थानिक विक्रेत्यांना एका ऑनलाईन व्यासपीठावर एकत्र आणणे, हा या वेबपोर्टलचा मुख्य हेतू होता. ऑक्टोबर २०१४ साली इंदौर येथे या पोर्टलला सुरुवात करण्यात आली. स्ट्रीटबाजार.इन या ऑनलाईन बाजारपेठेत तुम्हाला वैविध्यपूर्ण स्थानिक उत्पादने, बॉलिवूडमधील तत्कालीन फॅशन तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांकडील उत्पादने मिळणार आहेत. विशेष म्हणजे या पोर्टलने फक्त बॅग विक्री करण्यासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये बॅग्स.इन (bags.in) नावाचे एक खास पोर्टल सुरू केले आहे. कालांतराने या पोर्टलने कपड्यांची जाहिरातदेखील या पोर्टलवर सुरू केली. या पोर्टलवर सध्या दहा हजार ग्राहक नोंदणीकृत आहेत.

image


२६ वर्षीय नीरज वणी आणि २४ वर्षीय सुरभी वणी, हे या कंपनीचे संस्थापक असून, त्यांना खरेदीची विशेष आवड आहे. नीरज सांगतात, 'आम्ही काही कामाकरिता पुण्याला गेलो होतो. तेथे असताना मोकळ्या वेळेत आम्ही रस्त्यावरील दुकानांमध्ये खरेदी करण्याचे ठरविले. मात्र आम्हाला तेथे तशी बाजारपेठ सापडली नाही. कदाचित आम्ही तेथे नवीन असल्याने आमच्या लक्षात आले नसेल. आम्हाला तेथे फक्त मोठ मोठे शॉपिंग मॉल दिसत होते. तेव्हा आमच्या मनात या पोर्टलची कल्पना आली.' आपल्या अनुभवाबद्दल बोलताना सुरभी सांगतात की, 'आम्ही अशी अनेक वेबपोर्टल पाहिली आहेत, जी पारंपारिक आणि स्थानिक उत्पादनांच्या विक्रीची जाहिरात करतात. बऱ्याच वेळेस ते उत्पादनाच्या दर्जासोबत तडजोड करत असतात तसेच त्यांच्या किंमती जास्त ठेवत असतात. तेव्हा आम्ही ग्राहकांना खरी पारंपारिक उत्पादने योग्य दरात देण्याचा विचार केला.' कॅझ्युअल कुर्त्याची किंमत पोर्टलवर किमान तीनशे रुपये एवढी असते. तसेच डिझायनर लेहंगा सात हजाराच्या आत तयार करता येऊ शकतो.

देशभरातील विक्रेत्यांना आपल्यासोबत जोडण्यासाठी स्ट्रीटबाजार प्रोत्साहित करत असते. ते विक्रेते स्ट्रीटबाजार कुटुंबाचा एक भाग व्हावेत, याकरिता प्रयत्न करत असते. नीरज सांगतात की, 'परदेशी नागरिकांना आम्हाला सर्वोत्तम दर्जाची भारतीय संस्कृती आणि परंपरा दाखवायची आहे. कारण पारंपारिक पोशाख पद्धती अद्यापही हद्दपार झालेली नाही.' सुरभी सांगतात की, 'पारंपारिक पोशाख पद्धतीची एकूण बाजारपेठ सात कोटीपेक्षा अधिक किंमतीची आहे. उत्सव फॅशन, सीबाजार आणि क्राफ्ट्सविला यांसारखे पोर्टलदेखील पारंपारिक पोशाख पद्धतींकरिता प्रसिद्ध आहेत. आम्ही आमच्या पोर्टलवरील विक्री प्रक्रिया अधिक सुकर आणि विक्रेते तसेच ग्राहकांकरिता सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहोत.' विक्रेत्यांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून ते आपल्या पोर्टलकरिता महसूल गोळा करतात.

image


नीरज यांनी इंदौर येथील आयपीएस महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर आयआयटी दिल्ली येथून उद्योजकतेचा अभ्यास केला आहे. जेव्हा त्यांनी स्ट्रीटबाजारची सुरुवात करण्याचे ठरविले, तेव्हा त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांच्याकडे साशंकतेने पाहिले. सुरभी यांनी देखील एमबीएचे शिक्षण घेतले असून, दोघांनीही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरीला रामराम ठोकला. 'आमच्या मित्रपरिवारातील अनेकांनी या निर्णयामुळे आम्हाला वेड्यात काढले होते. मात्र प्रवाहाविरोधात जाणारी माणसेच इतिहास घडवतात, असा आमचा ठाम विश्वास होता', असे नीरज सांगतात. बॅगसाठी खास तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर ते फॅशनेबल दागिन्यांची देखील विक्री करतात. देशभरातील कोणत्याही रस्त्यावर तुम्ही ज्या किमतीला त्या दागिन्यांची खरेदी कराल, त्याच किंमतीला तुम्हाला ते या पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत. शंभर रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत दागिने या पोर्टलवर उपलब्ध आहेत.

सुरभी सांगतात की, 'आमच्या या उपक्रमात अधिकाधिक विक्रेत्यांना जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याशिवाय आमच्या व्यवसायाच्या देशा-विदेशातील विस्तारासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. बाजारपेठांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही फॅशनमध्ये बदल करत असतो. बॉलीवूड फॅशनचे प्रतिबिंब आमच्या या पोर्टलवर दिसते.' या पोर्टलवरील पार्टी-वेयर गाऊन्सची किंमत दोन हजार ८९९ ते पाच हजार ७९९ यादरम्यान आहे. नीरज सांगतात की, 'ज्या प्रमाणे एच. जॅक्सन ब्राऊन ज्यु. यांनी सांगितले आहे की, 'तुमच्या उद्यासाठी सर्वात चांगली तयारी म्हणजे तुमचे आजचे काम सर्वोत्तम प्रकारे करणे', या उक्तीप्रमाणे आम्ही स्थानिक विक्रेत्यांच्या साथीने आमचा सर्वोत्तम प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. तसेच फॅशन ट्रेंड सारखा बदलत असतो, याचीदेखील आम्ही खबरदारी घेतो.'

लेखक – मुक्ती मसिह

अनुवाद – रंजिता परब