महिला सक्षमीकरणाची अनोखी कहाणी: मंजुळा वाघेला!
जर कुणाला महिला सबलीकरणाची व्याख्या समजावून घ्यायची असेल तर, गुजरातच्या अहमदाबाद येथे राहणाऱ्या मंजुळा वाघेला यांचे उत्तम उदाहरण आहे. ज्यांचे शिक्षण केवळ दहावी पर्यंत झाले असले तरी, आज त्या शहरातील चारशे महिलांना रोजगार देत आहेत. तसेच त्यांचे भविष्य घडवत आहेत आणि त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास देखील निर्माण करत आहेत. ‘सौंदर्य सफाई उत्कर्ष महिला सेवा सरकारी मंडळ लिमिटेड’ नावाच्या एका सहकारिताच्या (को-ऑपरेटिव) कर्ताधर्ता मंजुळा एकेकाळी शहरांच्या रस्त्यांवर कचरा वेचून दिवसभरात पाच रूपये कमवायच्या, मात्र आज त्यांच्या संस्थेची एकूण उलाढाल (टर्नओवर) ६० लाख रूपये आहे.
मंजुळा वाघेला सांगतात की, “आम्ही सहा भाऊ – बहिण होतो आणि वडिल गिरणी कामगार होते. घरची परिस्थिती देखील हलाखीची असल्यामुळे दहावीच्या पुढील शिक्षण घेणे माझ्यासाठी अशक्य होते. मंजुळा यांचा विवाह अशा एका व्यक्तिशी झाला जे कामगार होते. त्यामुळे त्यांच्या घरचा खर्च देखील बेतानेच चालत असे. तेव्हा त्यांनी घराबाहेर पडण्याचा आणि चार पैसे कमविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कचरा वेचण्यापासून सुरुवात केली. याप्रकारे त्या दिवसभरात केवळ ५ रूपयेच कमवत होत्या. त्यावेळी त्या कुणाच्या तरी सांगण्यावरुन इलाबेन भट्ट यांची संस्था ‘सेल्फ एंप्लाइड विमेंस असोसिएशन’ (सेवा) च्या सदस्य झाल्या. ही संस्था महिला सबलीकरणाशी निगडीत काम करते. संस्थेमध्ये अनेक प्रकारची मंडळे देखील होती, जी वेगवेगळ्या प्रकारची कामे देखील करत असत. यामार्फतच वर्ष १९८१ मध्ये स्थापन करण्यात आलेली ‘सौंदर्य सफाई उत्कर्ष महिला सेवा सहकारी मंडळ लिमिटेला’ मंडळांमध्ये स्थान देण्यात आले. हे मंडळ शहरातील विभिन्न शासकीय आणि अशासकीय कार्यालयात साफसफाईचे काम करत असे.
मंजुळा सांगतात की , “अहमदाबादच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ डिजाइन येथे मी पहिल्यांदा साफसफाई आणि झाडू मारण्याचे काम केले होते.” येथे मंजुळा यांना तीन तास काम करावे लागायचे आणि या कामाच्या बदल्यात त्यांना प्रत्येक महिन्यात ७५ रूपये मिळायचे. “काही काळ हे काम केल्यानंतर जेव्हा संस्थेला दुस-या ठिकाणी देखील काम करण्यास सांगण्यात आले, तेव्हा तेथे मला पाठविले जाऊ लागले आणि माझी प्रगती करून मला पर्यवेक्षक पदावर रूजू करण्यात आले. अशाचप्रकारे मला काही दिवसांनी मंडळाचे सचिव बनविण्यात आले. सचिव झाल्यानंतर मंजुळा ‘सौंदर्य उत्कर्ष महिला सेवा सहकारी मंडळा’चा कार्यभार सांभाळायला लागल्या आणि कार्यालयाशी संबंधित दुस-या कामांची जबाबदारी देखील सांभाळायला लागल्या. मंजुळा यांचे म्हणणे आहे की, त्यांनी या दरम्यान दुस-या महिलांना देखील आपल्या मंडळात सामिल करण्याचे काम देखील सुरु केले. अशाप्रकारे ३१ महिलांसोबत सुरु झालेली ही संस्था आज ४०० महिलांना रोजगार देण्याचे काम करत आहे.
मंजुळा यांची मेहनत बघून जवळपास १५ वर्षांपूर्वी त्यांना ‘सौंदर्य सफाई उत्कर्ष महिला सेवा सहकारी मंडळा’च्या कर्ताधर्ता बनविण्यात आले. मंजुळा यांचे म्हणणे आहे की, “माझा जास्तीत जास्त प्रयत्न दुस-या गरीब महिलांना स्वत:सोबत सामिल करण्याचा असतो, जेणेकरून गरीब आणि बेरोजगार महिलांच्या खाण्या-पिण्याची सोय होऊ शकेल.” मंजुळा यांच्या देखरेखीखाली अहमदाबादच्या ४५ ठिकाणी या संस्था साफसफाईचे काम करत आहेत. या ठिकाणी शासकीय इमारती, अशासकीय इमारती, शाळा आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स यांचा समावेश आहे. आज मंजुळा वेगवेगळ्या ठिकाणी साफसफाईसाठी निघणारे टेंडर स्वत: भरण्यापासून दुसरे काम देखील स्वत:च करतात.
मंजुळा यांच्याच प्रयत्नाने आज त्यांच्या संस्थेमधील महिलांना जीवन विमा आणि निवृत्तीवेतन यांसारख्या सुविधा देखील मिळाल्या आहेत. मंजुळा यांच्या मते, जीवन विमाचा लाभ घेण्यासाठी महिलांना प्रत्येक वर्षी ४०० रुपये भरावे लागतात, ज्याच्या बदल्यात त्यांना एक लाख रूपयांचा विमा मिळतो. तर निवृत्तीवेतनासाठी त्यांची संस्था महिलांकडून प्रत्येक महिन्याला ५० रूपये घेते आणि उर्वरित ५० रूपये संस्था स्वत:कडून देते. अशाप्रकारे महिलांच्या निवृत्तीवेतनाच्या खात्यात १०० रूपये जमा होतात. ६० वर्षानंतर ज्या महिलेने जितकी वर्ष नोकरी केलेली असते, त्यांना त्याचप्रकारे निवृत्तीवेतन मिळते. तसेच याव्यतिरिक्त ही संस्था येथे काम करणा-या महिलांना प्रत्येकवर्षी लाभांश देखील देखील देते.
मंजुळा यांचे म्हणणे आहे की, ‘सौंदर्य सफाई उत्कर्ष महिला सेवा सरकारी मंडळ लिमिटेड’ ची आज एकूण उलाढाल (टर्नओवर) ६० लाख रूपये आहे. ज्याला त्यांनी पुढील वर्षापर्यंत एक कोटी रूपयांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी त्यांचे म्हणणे आहे की, त्यांची संस्था अद्याप केवळ अहमदाबादमध्येच काम करत आहे. मात्र, आता त्यांचा प्रयत्न गुजरातच्या दुस-या भागांमध्ये देखील काम करण्याचा आहे. त्यांच्यामते, अहमदाबादनंतर ज्या शहरात आम्ही काम करण्यास जाऊ त्यात वडोदरा आणि सूरत या शहरांचा समावेश आहे. आज या संस्थेत अधिकाधिक महिला ३० ते ५५ वर्ष वयोगटातील आहेत. मंजुळा यांचे म्हणणे आहे की, या संस्थेमुळे महिलांचा, मंडळाचा आणि सोबतच माझा देखील विकास झाला. या संस्थेने मला सर्वकाही दिले.
लेखक : हरिश बिश्त
अनुवाद : किशोर आपटे.