ग्रामीण भागातून महिला उद्योजक तयार करणारं ‘ग्रामालय’
चूल आणि मूल या चक्रातून आजची स्त्री बाहेर पडली आहे असं नेहमी म्हटलं जातं. पण स्त्रियांना घराबाहेर पडून स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो. त्यात शहरी भागातील स्त्रियांना संधी मिळत असली तरी ग्रामीण भागात पैसे कमावण्याच्या संधींचा अभाव असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करुन दिली तर ग्रामीण भागातील गरीबीत नक्कीच घट होऊ शकते. जागतिक बँकेच्या २०११मधील अहवालानुसार पुरूष आपल्या कमाईतील बरेचसे पैसे धुम्रपान, दारु आणि सट्ट्यावर खर्च करत असतात. तर महिला आपलं सर्व उत्पन्न कुटुंबाच्या गरजांवर खर्च करतात.
ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करण्याच्या हेतुने तामिळनाडूमध्ये ‘ग्रामालय मायक्रो फायनान्स फाऊंडेशनी’ (जीएमएफ) ची स्थापना करण्यात आली. ही एक स्वयंसेवी संस्था असून महिला सशक्तीकरणासाठी काम करीत आहे. आपला हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी पारंपरीक लघु आर्थिक संस्थांपेक्षा वेगळी कार्यप्रणाली अवलंबली आहे. ग्रामालय मायक्रो फायनान्स फाऊंडेशन महिला उद्योजकांच्या मदतीसाठी त्यांची वेबसाईट www.milap.orgच्या माध्यमातून निधी गोळा करते. हेच या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
जीएमएफच्या सर्व महिला सभासदांना संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच प्रवेश दिला जातो. यात महिलांना कौशल्य विकास, तांत्रिक सहाय्य आणि बाजारपेठेतील जाहिरातीच्या प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणासाठी ‘मिलाप’ने अर्थसहाय्य केलंय. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिलं जातं. महिलांना सेंद्रिय शेती, केळी किंवा ज्वारीचं उत्पादन, कपड्यांवरील पेंटिंग तसंच त्यांच्या आवडीनुसार शिल्प प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणानंतर या महिलांना बचतगटांशी जोडलं जातं. या माध्यमातून महिला नवीन व्यवसाय सुरू करु शकतात किंवा आपल्या व्यवसायाचा विस्तार करु शकता.
जीएमएफमार्फत महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम संस्था करते. यामुळे महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं धैर्य येतं, असं संस्थेच्या कार्यकारी अधिकारी गीता जगन सांगतात. अनेक महिलांना पती किंवा मुलानं दिलेल्या पैशांचा आधार असतो पण त्यातूनही त्या बचत करु शकत नाहीत. अनेक महिलांना बँकेतील सेवा आणि योजनांचा वापर कसा करायचा हेच माहिती नसतं, अशा महिलांना मदत करण्याचं काम संस्था करते. महिलांना त्यांची क्षमता पूर्णपणे वापरण्याची संधी दिली तर देशविकासात त्या मदत करु शकता असं मतही गीता व्यक्त करतात.
कर्ज घेणाऱ्याला जीएमएफतर्फे दहा हजार ते बारा हजार रुपये कर्ज दिलं जातं. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना एक ते दीड वर्षांचा अवधी दिला जातो. बँका, आर्थिक संस्था आणि खासगी स्वरुपात देण्यात आलेल्या दानाच्या माध्यमातून जमलेल्या निधीमधून हे कर्ज दिलं जातं. संस्थेतर्फे कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवलेल्या रेवती सांगतात की त्या सुरुवातीला विरंगुळा म्हणून शिवणकाम करायच्या, त्यातून त्यांना जास्त उत्पन्न मिळत नव्हतं, पण जीएमएफच्या कौशल्य आणि व्यवसाय विकास प्रशिक्षणाबद्दल ऐकल्यानंतर काहीतरी नवीन करण्याचा निश्चिय केल्याचं रेवती सांगतात. आता त्या ५ सदस्य असलेल्या बचतगटाच्या सभासद आहेत. त्यांनी ज्वारी आणि केळीचं उत्पादन कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण घेतलं आहे.
उद्योजक होण्यासाठी फक्त काही तरी करण्याची तीव्र इच्छा असून चालत नाही तर त्यासाठी घराबाहेर पडून काहीतरी करुन दाखवण्याचा आत्मविश्वास असावा लागतो असा सल्ला त्या इतर महिलांना देतात. त्याचबरोबर कुटुंबियांची मदत खूप मोलाची ठरते. पण शिक्षणाचा अभाव हा स्त्रियांच्या प्रगतीमधील अडसर असल्याचं त्या सांगतात. त्यासाठी महिलांनी शिक्षणाची वाट सोडता कामा नये असंही रेवती सांगतात. एकूणच ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी समाजातून आणखीही मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. फक्त आर्थिक मदत नाही तर महिलांना पाठिंबा आणि सहकार्य करण्याचीही गरज आहे.