त्यांच्या यशाचं 'कुरिअर'...ध्रुव लाकरा
ज्यानं दिला त्यांच्या ‘मूक’ जगाला ‘आवाज’...ध्रुव लाकरा
असं म्हणतात की मुसळधार पाऊस थांबवण्याची ताकद छत्रीमध्ये नसते, पण त्याच पावसात पाय रोवून उभं रहाण्याची हिंमत मात्र तुम्हाला त्याच छत्रीमुळे मिळते. खरंच, जगात हिंमत ही एकच अशी गोष्ट असते, जी आपल्याला कोणत्याही वादळात पाय रोवून उभं रहाण्याची प्रेरणा देते. आणि त्याच हिंमतीच्या जोरावर आपण दुस-यांसाठी काहीतरी करुन दाखवण्याचं धैर्य दाखवू शकता. अशाच एका अवलियाचं नाव आहे ध्रुव लाकरा, ज्यांनी फक्त आपल्या हिंमतीच्या जोरावर निर्धार केला होता गरीब कर्णबधिर लोकांसाठी काहीतरी करण्याचा. त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचा. ध्रुव यांनी ऑक्स्फर्ड विद्यापीठातून एमबीए अर्थात व्यवस्थापन शास्त्राची पदवी घेतली होती. त्यामुळे त्यांनी विचार केला असता, तर लठ्ठ पगाराची नोकरी स्विकारुन अगदी आरामाचं आयुष्य घालवता आलं असतं. पण त्यांनी मार्ग निवडला तो एक सामाजिक व्यावसायिक बनून समाजासोबत स्वत:साठीही भविष्य घडवण्याचा.
ध्रुव यांनी ‘मिरॅकल कुरिअर’ नावाची कंपनी सुरु केली. ही भारताची पहिली अशी कुरिअर कंपनी होती, की जिच्यात काम करणारे सर्व कर्मचारी हे कर्णबधीर आहेत. त्यांना ऐकू येत नाही. ध्रुव हे मूळचे मुंबईचे. मुंबई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एक इनवेस्टमेंट बँकर म्हणून काम करणं सुरु केलं. लोकांना पैसा कसा आणि कुठे गुंतवायचा याचं मार्गदर्शन करू लागले. रोज सकाळी ऑफिसला जायचं आणि रात्री उशीरा घरी परत यायचं हेच त्यांचं आयुष्य झालं होतं. पण त्यांच्या मनात अशी काहीतरी इच्छा होती, की जी या अशा प्रकारच्या कामामुळे त्यांना पूर्ण करता येत नव्हती. त्यामुऴे त्यांनी ते काम सोडून थेट तामिळनाडू गाठलं. तिथे त्यांनी मच्छिमारांची काम करण्याची पद्धत खूप जवळून पाहिली, तिचा अभ्यास केला. त्यांच्या हे लक्षात आलं की काम कितीही कठीण असलं, तरी ते जर सुनियोजित पद्धतीने केलं, तर ते सोपं होतं. २००४ साली आलेल्या त्सुनामी वादळानंतर ध्रुव यांनी मदतकार्यामध्ये स्वत:ला झोकून दिलं होतं. आणि त्याचवेळी मनात पक्का निश्चय केला की भविष्यात ते असंच काहीतरी काम करतील ज्यामध्ये आर्थिक मिळकत तर होईल, पण समाजाची सेवाही करता येईल.
यानंतर ध्रुव यांनी ऑक्स्फर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला, जिथे त्यांनी सामाजिक उद्योगशास्त्रात एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. ऑक्स्फर्डमध्ये ध्रुव यांना खूप काही शिकायला मिळालं. इथे ते अनेक देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना भेटले, त्यांच्या देशातल्या समस्या, त्यांची जीवनशैली जाणून घेतली. एमबीए पूर्ण केल्यानंतर ध्रुव मुंबईत परतले. मुंबईत एकदा बसमध्ये प्रवास करत असताना ध्रुव यांच्याशेजारी एक मुलगा येऊन बसला. तो फार अस्वस्थ वाटत होता. कधी खिडकीतून बाहेर, तर कधी बसमध्ये, अशी त्याची नजर सतत भिरभिरत होती. ध्रुवनी त्याची चौकशी केल्यानंतर त्यांना खरं कारण समजलं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर तो मुलगा काहीच बोलला नाही. नंतर त्यांना जाणवलं की तो मूक-बधीर आहे म्हणून. या घटनेनंतर ध्रुवनी निश्चय केला की शारिरिकदृष्ट्या अक्षम लोकांसाठी काम करायचं. पण त्यांच्यासमोर समस्या होती ती म्हणजे असं कोणतं काम निवडावं ज्यातून अशा लोकांना व्यवसायात सामावूनही घेता येईल आणि त्यांचा आर्थिक फायदाही होईल. खूप विचार केल्यानंतर त्यांनी एक कुरिअर कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. आणि अशा प्रकारे ‘मिरॅकल कुरिअर’चा जन्म झाला.
ध्रुव यांनी अशा लोकांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली, आणि निश्चय केला की या कंपनीमध्ये सगळे कर्मचारी हे कर्णबधीर असतील. काम फार अवघड होतं. पण ध्रुव यांचा निर्धार पक्का होता. मग त्यांनी कामाची वाटणी केली. महिलांना कार्यालयीन कामं, अर्थात डेटा एन्ट्री(माहिती तयार करणं), ट्रॅकिंग(कुरिअरची त्या वेळची पोहोच) आणि फाईलिंग(माहितीचं संकलन) सोपवली. तर पुरुषांना कुरिअर पोहोचवण्याची कामं सोपवली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळं काम इतक्या सुनियोजित पद्धतीने होत होतं, की कुठेच कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही. आजपर्यंत ‘मिरॅकल कुरिअर’ने घेतलेलं एकही कुरिअर चुकीच्या पत्त्यावर गेलेलं नाही.
‘मिरॅकल कुरिअर’मध्ये सध्या एकूण ६८ जणांची टीम काम करते. यामध्ये फक्त चार जण व्यवस्थापनाचं काम करतात. तर इतर ६४ जण हे मूकबधीर आहेत. ४४ पुरुष कुरिअर पोहोचवण्याचं काम करतात. यातल्या प्रत्येकाला मुंबईचा प्रत्येक रस्ता जणू पाठ झालाय. हे सगळेच जण गरीब कुटुंबातून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात काम मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या कामामुळे या सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.
भारतात आजघडीला तब्बल ८० लाख मूकबधीर व्यक्ती आहेत. आणि यातल्या बहुतांश व्यक्ती या मुख्य प्रवाहापासून खूप दूर लोटल्या गेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत कुणीतरी या लोकांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी पुढाकार घेणं ही खरंच एक प्रशंसनीय बाब आहे. दर महिन्याला ‘मिरॅकल कुरिअर’ तब्बल ६५ हजारपेक्षा जास्त कुरिअर योग्य पत्त्यांवर पोहोचवतं. कंपनीला यातून चांगला नफा होऊ लागलाय. त्यामुळे असं म्हणता येईल की ही एक नफ्यासाठीच सुरु झालेली कंपनी आहे, जी नफ्यासोबतच समाजसेवाही करते.