शिवतेजाने वलयांकीत आणखी एक गुरूजी; ‘संभाजी भिडे गुरूजी’!
मराठी मुलूखात ‘गुरूजी’ या शब्दाला जेवढे वलय आहे तेवढे कदाचित आई किंवा वडील या शब्दालाही नसावे, याचे कारण आई वडील जरी जन्म देत असले तरी गुरूजी जे संस्कार देतात त्यातून माणसाच्या जन्माला दिशा मिळते, म्हणजे जीवन परिपूर्ण होत असते. यावर आमचा दृढ विश्वास आहे, आणि ते योग्यच आहे. आपल्याकडे गावोगाव शाळा शिकवतात ते गुरूजी असोत किंवा धार्मिक विधी करून सांस्कृतिक नाळ जोडतात ते गुरुजी असोत त्यांना नेहमीच आदराचे स्थान दिले गेले आहे. सांप्रतच्या काळात मराठी माणसाला इतिहासातील दोन गुरूजींबद्दल माहिती आहे आणि आदर देखील आहे. एक म्हणजे ‘साने गुरूजी’ ज्यांनी ‘जगी हा एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे’ असे शिकवले, आणि दुसरे ‘माधव गोळवलकर गुरूजी’ ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिशा दिली आणि ‘जननी जन्मभुमी स्वर्ग से महान है’ असा राष्ट्रवाद शिकवला.
पण सध्या आपल्या महाराष्ट्रात आणखी एक गुरूजी आहेत ज्यांची तुम्हाला ओळख करून देणार आहोत, ते आहेत संभाजी भिडे गुरूजी!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या चित्रात दिसणारी ही साधारणशी व्यक्ती कुणीतरी असाधारण असेल तुम्हाला वाटणारही नाही असे त्यांचे राहणीमान आहे. पण माहिती घेतली तर तुम्ही हैराण व्हाल ही व्यक्ती साधारण शेतक-यासारखी दिसते ती ‘एमएससी फिजिक्स’ मध्ये दोन सुवर्णपदके मिळवणारे संभाजी भिडे गुरूजी आहेत! देश आणि समाजासाठी सारे जीवन ‘शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान’ या चळवळीच्या माध्यमातून अर्पण करणा-या गुरूजींचे वय सध्या नव्वदीच्या घरात आहे. कोणत्याही प्रसिध्दीपासून दूर राहात त्यांचे काम चालते. साधारणत: कर्नाटक, महाराष्ट्र, आणि आंध्रप्रदेशात भिडे गुरूजी यांच्या या कार्याचा प्रसार असून त्यांच्या एका हाके सरशी लाखो तरूण या भागात उभे राहतात. असे असले तरी गुरूजींच्या राहणीमानात तुम्हाला हे जाणवणार सुध्दा नाही, एका छोट्याश्या खोलीत त्यांचा मुक्काम असतो, त्यांची संपत्ती म्हणजे दोन धोतर जोड्या, कुर्ता आणि भेट म्हणून मिळालेली असंख्य पुस्तके. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या जीवनातील प्रसंगावरून आजच्या तरुणांनी राष्ट्रवाद शिकावा असा गुरूजींचा प्रयत्न असतो. त्यासाठी त्यांनी सारे जीवन अर्पण केले आहे.
या छायाचित्रात आपण पाहतो आहोत ते २०१४च्या निवडणूक प्रचारासाठी सांगली भागात पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी आले होते त्यावेळी त्यांनी गुरूजी यांची भेट घेतली होती. मोदी यांनी त्यांना आपण पंतप्रधान झालो तर काय करावे असे विचारले असता गुरूजी म्हणाले होते की, “ज्यावेळी आपण लाल किल्यावरून भाषण कराल त्यावेळी बुलेटफ्रूफ काच लावू नका आणि डोक्याला फेटा बांधावा”, गुरूजींचा तो सल्ला आजही मोदी पाळतात आणि त्यांनी त्यांचे अनुकरण केले आहे.
त्यावेळी आशिर्वाद घेताना मोदी म्हणाले होते की, मी येथे भिडे गुरूजी यांच्या निमंत्रणावरून नव्हे आदेशावरून आलो आहे. ते म्हणाले होते की, “हम लोग आप जैसे असंख्य तपस्वीओको जानते है जो हमारे असली हिरो है हमे आपका अनुसरण करना है।”
हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी जीवन अर्पण करण्यापूर्वी गुरूजी पुणे विद्यापिठात अध्यापनाचे काम करत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत कार्यात सहभागी होत. १९८०च्या सुमारास त्यांनी शिवप्रतिष्ठान स्थापन करून समाजसेवा आणि राष्ट्रवाद यांच्यात समन्वय तयार करण्याचे काम सुरू केले. गुरूजींचे ज्वलंत विचार आणि साधी राहणी ही ओळख आहे, ते आजही पायात पादत्राणे घालत नाहीत, आणि कोणत्याही राजकीय पक्षात ते सहभागी नाहीत. असे असले तरी त्यांच्या बंडखोर विचारांनी आणि जाज्वल्य देशभक्तीपर कृतीने ते असंख्य वेळा न्यायालयासमोर गेले आहेत. २००८मध्ये ‘जोधा अकबर’ या सिनेमात हिंदूबद्दल आक्षेपार्ह गोष्टी दाखविण्यात आल्याने त्यांनी आंदोलने केली त्यावेऴी देखील त्य़ांच्यावर खटला दाखल झाला होता.
छ. शिवरायांच्या गडकोट किल्ल्यासोबतच त्यांच्या विचारांचे संवर्धन करावे आणि नवतरूणांना ते विचार देवून त्यांच्यात राष्ट्रप्रेम निर्माण करावे असा गुरूजींचा प्रयत्न असतो. गुरूजी नेहमी सांगतात की, ‘इतिहास आपला खरा शिक्षक आहे त्यावेळी कोणत्या चूका झाल्या त्या टाळून आपण छत्रपती शिवरायांच्या मार्गाने या देशाला शक्तिवान केले पाहिजे’. चीन आणि पाकिस्तानच्या आक्रमकतेला तसेच उत्तर दयायला हवे असे ते मानतात, त्यांचा उद्घोष असतो ‘जयतू हिंदू राष्ट्रम्’!