ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०१६ ब्रिक्स देशांमध्ये नवे पर्व सुरू होईल - मुख्यमंत्री रशिया,चीन आणि दक्षिण आफ्रिकेतील शिष्टमंडळांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा
ब्रिक्स देशाच्या शहरांमधील समस्या आणि आव्हाने ही जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे या देशांचे आपले अनुभव आणि कल्पना यांच्या माध्यमातून शहरांचा विकास करणे अधिक सुलभ होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून ब्रिक्स देशांमध्ये सहकार्याचे एक नवे पर्व सुरू होवून औद्योगिक गुंतवणूकीसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिकेतील शिष्टमंडळांसोबत हॅाटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
तीन दिवसीय ब्रिक्स मैत्री शहरे परिषदेचे (Brics Friendship cities conclave 2016 )आयोजन करण्यात आले आहे. त्या परिषदेस आलेल्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा करून शिष्टमंडळाचे स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून झपाट्याने विकसित होणारे शहर आहे. राज्य शासन देशातील पहिली स्मार्ट सिटी नवी मुंबई येथे सिडको भागात उभारणार आहे. सगळ्या सेवा देणारे हे स्मार्ट शहर असणार आहे. स्मार्ट सिटी विकसित करणे आणि लोकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनांने प्राधान्य दिले आहे. तसेच लोकांच्या सूचना आणि कल्पना मागविण्यासाठी`आपले सरकार` वेब पोर्टल विकसित केले असून जास्तीत जास्त सूचनांची दखल घेवून अंमलबजावणी केली जाते. तसेच सेवा हमी विधेयकांतर्गत अधिकाधिक सेवा ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण असून उद्योग उभारणीसाठी आवश्यक लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहेत. महाराष्ट्र हे ‘आयटी हब’ असून शासनाने नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर केले आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक झाली आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
औद्योगिकरणाला गती देण्यासाठी ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’ च्या माध्यमातून उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करून उद्योगवाढीसाठी सुलभ व गतिमान प्रक्रिया अंमलात आणली आहे. राज्यात फर्निचर आणि हाऊसिंग उद्योगात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे यात आपल्याला सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बंदरांच्या विकासासाठी शासनाने सर्वंकष धोरण आखले आहे. शाघांय शहरामध्ये अतिशय उत्तम पध्दतीने कचऱ्यावर प्रक्रिया करून शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जाते. त्याच धर्तीवर मुंबईत कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी आपली मदत घेण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, शाघांय महापालिकेचे उपसचिव हुआंग राँग, दशिण आफ्रिकेतील शिष्टमंडळाचे प्रमुख सुबेश पिल्लई, सेंट पिटर्सबर्ग शहराचे उपराज्यपाल सरजी मोचॉन, केंद्रिय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संचालक अलोक डिंमरी, रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख जॉर्जी पोल्हव्हचेन्को, चीन मधील शिष्टमंडळाचे प्रमुख चीय युआन आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, रशियाच्या शिष्टमंडळांने मुख्यमंत्र्यांना रशिया भेटीचे निमंत्रण दिले.