दिव्यांगत्वावर मात करणा-या निर्मलकुमार यांचे समूह परिवहन क्षेत्रात क्रांतीकारी पाऊल!
भारतात खूप चांगली कामे होताना दिसत आहेत. सकारात्मक परिवर्तन होत आहे. तरुण, उद्यमी नव्या क्रांती करत आहेत. जुन्या प्रथा परंपरा बाजुला करुन नव्याने काही होताना दिसत आहे. नव्या आधुनिकतेची त्याला चांगली साथ मिळत आहे. या नव्या भारतीय क्रांतीमध्ये रोज नवी भर पडताना दिसत आहे. त्यांनी त्यांच्या क्षमता, प्रतिभा आणि मेहनत यातून नव्या कहाण्या तयार केल्या आहेत. अशीच यशाची अनोखी कहाणी निर्मलकुमार यांची आहे. त्याची जन्मभूमी बिहार असली तरी कर्मभूमी गुजरात आहे. देशात वाहतूक क्षेत्रात नवी क्रांती करणारे आणि परिवहन क्षेत्रात विशेष जागा मिळवणारे निर्मलकुमार यांनी ऑटो चालक आणि प्रवासी यांच्या समस्या ओळखून त्या दूर करण्यासाठी विशेष कष्ट आणि मेहनत केली आहे. त्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे. अजूनही या साठी त्यांचे काम सुरूच आहे. देशात पहिल्यांदा ऑटोसमुह तयार करून या क्षेत्राचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘जी ऑटो’ या नावाची त्याची कंपनी यासाठी काम करते. त्यात त्यांनी चालकांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यांच्या या प्रयत्नांची कहाणी संघर्षांची कहाणी आहे. तीन वर्षांचे असताना पोलिओचे शिकार झालेले निर्मलकुमार यांच्या मनात मात्र नव्या उमेद आणि आशा संपल्या नाहीत. अपंगत्वावर मात करत त्यांनी पुढील वाटचाल केली. त्यामुळेच त्यांची ही कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे.
बिहार मधील सिवान जिल्ह्यात रिसौरा या गावी त्यांचा १३ सप्टे,१९८१ मध्ये जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षक आणि आई गृहिणी होत्या. त्यावेळी बिहारच्या राज्यातील लोकांची स्थिती फारच वाईट होती. देशातील सर्वात मागास राज्यात त्यांची गणना होत होती. जेथे पायभूत सुविधा नव्हत्याच पण करोडो लोकांच्या रोजगार आणि उदरनिर्वाहाच्या साधनांची वानवा होती, यामुळे गरीबी उपासमारी आणि रोगराईचा विळखा होता, त्यातच इस्पितळाच्या सुविधा सुध्दा नव्हत्या. त्यातल्या त्यात हा आनंद होता की सरकारी शिक्षक असल्याने वडिलांना दरमहा उत्पन्न वेळेवर मिळत होते. त्यामुळे इतरांपेक्षा त्यांच्या घरची स्थिती बरी होती.
परंतू तीन वर्षांचे असताना निर्मलकुमार यांना पोलिओने गाठले. आई-वडिलांनी वैद्य-हकिमांचे इलाज केले. जादू टोणे यांचे प्रयोग झाले, उपास, नवस झाले मात्र पोलिओ काही बरा झाला नाही त्याने निर्मलकुमार यांना अपंगत्व आलेच. त्यांच्या शरीराची वाढ त्यामुळे सामान्य मुलांसारखी झालीच नाही मात्र निर्मल यांनी तरीही हार मानली नाही. त्यांनी शाळेत प्रवेश घेतला आणि मनापासून अभ्यास केला.
त्यांच्या मनात त्या काळाच्या आठवणी ताज्या आहेत, एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, त्यांच्या गावात एकच शाळा होती त्यात सगळी मुले येवून शिकत होती. तिसरीपर्यंत तर शाळा झाडाखाली भरत असे. निर्मल सांगतात की घरून गोणपाट घेवून जायचे आणि त्यावर झाडाखालच्या शाळेत बसून शिकायचे असे त्यांनी तीन वर्ष केले.
चौथीला त्यानाही इतर मुलांप्रमाणेच इमारतीमध्ये बसून शिकायला मिळाले. तेथेही बाकड्यावर बसायला नव्हते त्यामुळे गोणपाटावर बसूनच शिक्षण सुरु होते. सहाव्या वर्गात गेले त्यावेळी ते पहिल्यांदा बाकावर बसले. ते सांगतात की त्यावेळी असे वाटले की आपण खूप मोठे झालो आणि आपला खूप मोठ सन्मान झाला आहे.
निर्मल यांच्या गावातील शाळेत केवळ सातवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध होते. हायस्कुलच्या शिक्षणासाठी त्यांना तीन किमी दूर असलेल्या गावी जावे लागे. त्यावेळी पायीच त्यांना जावे लागत होते, काहीवेळा सहकारी त्यांना सायकलवरून नेत असत. त्यावेऴी त्यांना जाणिव होती की आपण इतरांसारखे नाही, त्यामुळे त्यांनी सारा वेळ अभ्यासात घालविला. त्यामुळे वर्गात ते इतरांच्या तुलनेत अव्वलच होते. नेहमी पहिल्या वर्गात!
त्याकाळी वीज नव्हती त्यामुळे कंदिलाच्या प्रकाशात शिक्षण सुरु होते. रोज सकाळी ते लवकर उठत आणि कंदिलांच्या प्रकाशात अभ्यास सुरु करत. निशक्त असुनही ते स्वत:ची कामे स्वत: करत असत. त्यांच्या इच्छाशक्तिचे बळ असामान्य होते. सुविधांचा आभाव अपंगत्व अशा अनेक अडथळ्यातून त्यांचे लहानपण त्यांनी घालविले मात्र त्याच्या मनात त्याने कधी निराशा आली नाही. त्यातच त्यांनी १९९५मध्ये महमदा हायस्कुल मध्ये दहावीची परिक्षा उत्तिर्ण केली. त्यात त्यांना चांगले गुण मिळाल्याने त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले. मात्र गावात राहून त्यांच्या प्रतिभेला स्थान मिळणार नाही हे ओळखून त्यांच्या वडिलांनी त्यांना पटना येथे जावून वैद्यकीय शिक्षण देण्याचे ठरविले.
नवी स्वप्ने घेवून गावातील निर्मल शहरात आले. त्यावेळी ते वातावरण पाहून ते दंग झाले. तेथील लोकांचे राहणीमान, वागणे, सारे काही गावाच्या पेक्षा वेगळेच होते. येथे कंदीलाचा प्रकाश नव्हता. चोविस तास वीज होती. येथे येवून त्यांनी परिचितांच्या मदतीने खोली घेतली. मग त्यांनी महाविद्यालय आणि शिक्षकांचा शोध घेतला. ते सांगतात की पटना येथील जीवन संघर्षाचे होते. मात्र त्यातूनच त्यांना आत्मनिर्भर बनण्यास मदत झाली. तेथे मदतील धावून येणारा कुणीच नव्हता. स्वत:चे जेवणही स्वत:लाच करावे लागत होते, मात्र शिक्षणात कोणताही खंड पडू द्यायचा नाही हे त्यांच्या मनाने घेतले होते. त्यासाठी ते रोज १४-१५ किमी सुध्दा चालत जात होते. सामान्य विद्यार्थ्यासारखे पायात बळ नव्हते, मात्र मनात महत्वाकांक्षा होती, या सा-या अडचणींना त्यांनी स्थान दिलेच नाही.
इतकी सारी मेहनत घेवूनही त्यांना वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळू शकला नाही. त्यांना अकरावी बारावीमध्ये चांगले गुण होते, त्यामुळे त्यांनी वैद्यकीय प्रवेशाची तयारी केली होती. त्यांनी दुस-याही महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यात त्यांना हैद्राबादच्या एन जी रंगा विद्यापीठात बीटेकसाठी प्रवेश मिळाला. त्यांना राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. त्यामुळे त्यांना प्रति महिना ८०० रुपये मिळत होते. मात्र हे पैसे त्यांच्या गरजेइतके नव्हते त्यामुळे त्यांनी जास्तीचे पैसे मिळवण्यासाठी शिकवण्या घेणे सुरु केले. ग्रामीण भागातून आले असल्याने त्यांनी शेती क्षेत्रात पदवी घेण्याचे ठरविले होते.
पटना वरून हैद्राबादला आल्यावर त्यांच्यात बरेच बदल झाले. येथील जीवनशैली वेगळीच होती. तेथे त्यांचे शिक्षण हिंदीत आणि भोजपूरीत झाले होते, मात्र हैद्राबादमध्ये इंग्रजीत शिक्षण सुरु झाले. सारे शिक्षक इंग्रजीत बोलत असत त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या विदयार्थ्यांना ते समजण्यास कठीण होते. निर्मल देखील यापैकी एक विद्यार्थी होते. ते पटना येथे शिकत होते त्यावेळी बहुतांश सहकारी त्याच राज्यातील म्हणजे बिहारी होते. त्यामुळे बोलचाल हिंदीतच होत असे मात्र हैद्राबादमध्ये स्थिती वेगळीच होती. कृषी विद्यापीठात शिकण्यासाठी देशाच्या कानाकोप-यातून विद्यार्थी आले होते. अनेकजण शहरी भागातून आले असल्याने फर्राटेदार इंग्रजी बोलत असत. निर्मलसारख्या इंग्रजी बोलता न येणा-या मुलांना लाज वाटत असे, त्यातच त्यांच्या ग्रामीण बिहारी बोलीची चेष्टा होत असे, उत्तर भारतीय विद्यार्थी ज्या प्रकारे इंग्रजी बोलत असत त्यांची सुध्दा कुचेष्टा केली जात असे. त्यातून उत्तर भारतीयांना अपमानित वाटत असे, त्यांच्या भाषेची चेष्टा त्यांना पसंत नव्हती.
त्यामुळे निर्मल यांनी विचार केला की या स्थितीमध्ये ग्रामीण विद्यार्थ्याची एकजूट केली पाहिजे, त्यांचा उद्देश होता या मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी मदत करणे आणि त्यात पारंगत करणे. त्यांचा हा विचार बहुतांश विद्यार्थ्याना पटला आणि ‘फिनिक्स’ नावाच्या समुहाची स्थापना झाली. फिनिक्स स्थापनेमागची संकल्पना निर्मल यांचीच असल्याने त्यांनाच त्याचे अध्यक्ष करण्यात आले. मग त्यांनी सदस्यांसाठी नियम आणि कायदे तयार केले, त्यात सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय हा होता की सारे जण केवळ इंग्रजीतच बोलतील. मग बोलताना चुका झाल्या तरी चालेल पण त्याच भाषेत बोलत राहिले पाहिजे, त्यात बोलताना ज्याने चुकून हिंदी शब्द वापरला त्याला दंड करण्याचा नियम करण्यात आला. त्यासाठी दरही निश्चित करण्यात आला. एक हिंदी शब्द वापरला तर पन्नास पैसे दंड होता. याचा अर्थ दहा शब्दाचे वाक्य हिंदीत कुणी बोलेल तर त्याला पाच रुपये दंड होता. त्यांच्या या नियमांची मात्रा चालू लागली त्यामुळे ग्रामीण भागातील मुले न घाबरता इंग्रजीत बोलण्याचा सराव करु लागली. ज्यांनी कधी ती भाषा वापरली नव्हती त्यांनाही ती वापरणे शक्य होवू लागले. काही महिन्यात परिणाम दिसू लागला अनेकांना इंग्रजी भाषा बोलता येवू लागली. मग सारेच न घाबरता इंग्रजीत बोलु लागले. त्यात पुन्ह दंड म्हणून जमा झालेल्या रकमेतून पार्टी होवू लागली. पण जसजसे दिवस गेले दंडाची रक्कम कमी होत गेली, निर्मल सांगतात की, मग काही जणांचा आत्मविश्वास इतका वाढला की त्यांनी वादविवाद आणि भाषण स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. काही जण तर त्यात यशस्वी देखील झाले. निर्मल यांच्या प्रयोगाने कृषी विद्यापीठाच्या परिसरात यश मिळवले आणि त्यांची लोकप्रियता देखील वाढली. त्यांच्या मते असे प्रथमच झाले की जीवनात त्यांना नायक म्हणून वावरता येवू लागले त्यामुळे ते खूश होते आणि त्यांचा उत्साह वाढला होता.
त्याच काळात त्यांना सनदी परिक्षा देवून आधिकारी व्हावे असे वाटले म्हणून त्यांनी त्यासाठी तयारी सुरु केली होती. निर्मल म्हणाले की, “बिहारच्या बहुतांश मुलांचे हेच स्वप्न असते, की ते आयएएस किंवा आयपीएस होतील मी सुध्दा त्यापैकी एक होतो. मी लहान असल्या पासून त्याबाबत ऐकत होतो मलाही वाटे की त्यातून जीवन सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे मी नागरी परिक्षा देण्याची तयारी सुरु केली. वास्तव हे होते की पदवी मिळवताना तुम्हाला खूप वेळ असतो. त्यामुळे हा वेळ सार्थकी लावण्यासाठी मी तयारी सुरु केली”.
पण निर्मल यांच्या नियतीने काही वेगळेच लिहिले होते, ते दुस-या वर्षात असताना आणि नागरी परिक्षेची तयारी करत असताना त्यांच्या एका वरिष्ठाने त्यांना आयआयएम बद्दल सांगितले. त एकून ते हैरान झाले. ते म्हणतात की, “ मी सनदी परिक्षा आणि आय आयटी बाबात माहिती घेतली होती मात्र त्यावेळी मला आयआयएम बाबत माहिती नव्हती. हैद्राबाद मध्ये प्रथमच मला त्याबाबत कुणीतरी सांगितले, मला समजले की, तिथे पात्र होण्यासाठी मुले दिवसरात्र पुस्तकात घुसून बसतात. मला आश्चर्य वाटले की, आयआयएममध्ये पदवी मिळवणा-यांना लाखो रुपये पगार असतो. सुरुवातीला माझा विश्वास बसला नाही पण नंतर मला वर्तमान पत्रात दाखविण्यात आले की मागील वर्षी कशाप्रकारे आयआयएम पदवीधारकांना ४८लाख रुपयांच्या पगाराच्या नोकरीत सन्मान मिळाला. तरीही माझा विश्वास बसेना त्यावेळी माझ्या वरिष्ठाने मला पाच सहा वेगवेगळ्या वर्तमान पत्रात तेच दाखविले. सारीकडे तीच बातमी ‘४८ लाखाचे पँकेज मिळाले’. मग मला विश्वास बसला आणि मी माझा निर्णय बदलला आणि मी प्रवेश परिक्षेच्या तयारीला लागलो.”
निर्मल यांनी इतकी छान तयारी केली की पहिल्याच प्रयत्नात त्यांना आयआयएम मध्ये प्रवेश मिळाला. त्यांना अहमदाबाद शहर मिळाले, त्यांच्या मते इथेही जीवन खूपच वेगळे होते, केवळ आणि केवळ प्रतिभावान असतात तेच इथे प्रवेश मिळवू शकतात. वेगवेगळ्या पार्श्वभुमीवरून आलेले विद्यार्थी त्यांना तिथे भेटले. त्यांचे विचार वेगळे होते, त्यात वेगेवेगळ्या मुलांशी बोलताना निर्मल यांनाही नवीन वेगळे विचार समजत होते. पहिल्याच वर्षी निर्मल यांनी व्यवस्थापना बाबत सारे काही ज्ञान मिळवले. दुस-या वर्षी त्यांना असे वाटले की काही असे करावे ज्याने त्यांना वेगळी ओळख मिळेल. त्यांना आता विश्वास होता की येथून बाहेर पडताना त्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकणार होती. मात्र त्यांच्या मनात वेगळे विचार येवू लागले. त्यांना वाटू लागले की इतरांपेक्षा काही वेगळे करावे. त्यांनी मनात निश्चय केला की सहकारी मित्रांप्रमाणे ते नोकरी करणार नाहीत. ते असे काही करतील ज्यातून जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल. नवे काय करता येईल? लोकांची मदत कशी करत येईल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यासाठी उद्यमिता करण्याचे वेड त्यांच्या मनात होते. उद्योजक बनणे त्यांच्यासाठी लक्ष्य होते. मात्र त्यांना माहिती नव्हते की त्यांनी काय करायला हवे होते?
त्याचवेळी अशी घटना घडली ज्यातून त्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलून गेली. ज्यावेळी त्याच्या आयआयएमच्या दुस-या वर्षातील अभ्यास सुरु होता, एक दिवस ते डिनरसाठी आयआयएम अहमदाबादच्या बाहेर गेले. गेटवर त्यांनी ऑटोची वाट पाहिली, तेथे ऑटो घेवून ते मित्रासोबत रेस्तरॉमध्ये पोहोचले, रिक्षावाल्याने मिटरप्रमाणे पन्नास रुपये घेतले. भोजन करून त्यांनी पुन्हा ऑटो केली आणि त्याने त्यांना आयआयएमच्या गेटवर आणून सोडले, त्याने ३५ रुपये मागितले, त्यांना आश्चर्य वाटले की जाताना त्याचा मार्गाने ५० रुपये आणि येताना ३५ रुपये असे कसे होवू शकते? त्यांनी हा प्रश्न रिक्षावाल्याला विचारला तर त्याने भांडण सुरु केले त्याने वाईट वागणूक दिली त्यामुळे त्यांना नाराज आणि वाईट वाटले. त्यांना वाटले की तो बेईमानी आणि बदमाशी करत होता, त्याला त्यांनी नाईलाज म्हणून पैसे दिले, मात्र त्यांच्या मनात ही घटना फिरु लागली. त्यांना वाटले की अशाप्रकारे कितीतरी लोक या रिक्षावाल्यांच्या जाचाला आणि फसवणुकीला बळी पडत असतील. त्यांनी विचार केला की ही स्थिती बदलण्याचा विचार का करु नये? त्यांना वाटले की ते ऑटोचालकांना संघटीतपणे प्रशिक्षण देवून जबाबदार नागरिक बनवू शकतात.
त्यांना विश्वास होता की त्याच्याजवळ व्यवस्थापनाचे कौशल्य होते त्यातून ही कल्पना परिणामकारक राबविता येईल. त्यांच्या या कल्पनेला मूर्त स्वरुप देत त्यांनी आयआयएमच्या गेटवरुनच १५ रिक्षावाल्यांना घेवून ही योजना सुरु केली. त्यासाठी त्यांनी या रिक्षावाल्याना इंसेटिव देखील दिले. त्यांनी सर्वांचे बँक खाते सुरु केले त्यांचे विमे उतरविले, ग्राहकांशी कसे वागावे याचे शिक्षण त्यांना देण्यास सुरुवात केली, इतकेच नाही त्यांच्या ऑटोचा रंगही बदलला, ग्राहकांसाठी रिक्षात वर्तमानपत्र आणि मोबाईल चार्जरची सुविधा दिली. रेडिओची सुविधा दिली.
असे नाही की हे सारे सहजपणे झाले, त्यासाठी निर्मल यांना खूप मेहनत घ्यावी लागली, त्यासाठी रिक्षांची निवड ही खूप कठीण गोष्ट होती. बहुतांश रिक्षावाले वेगळे काही करण्याच्या मानसिकतेचे नव्हते. संघटना आणि त्यांच्या नेत्यांना ते घाबरत होते, मात्र या योजनेचा फायदा पाहून १५ जण तयार झाले. निर्मल सांगतात की त्यावेळी त्यांच्याजवळ लॅपटॉपही नव्हता त्यामुळे ते डेस्कटॉपवर काम करत होते. त्यामुळे मित्रांचा लॅपटॉप घेवून त्यांना ही योजना तयार करावी लागली. हे लॅपटॉप घेवून ते वर्तमान पत्रांच्या संपादकाना-मालकांना भेटले आणि वर्तमानपत्रे द्यावी यासाठी विनंती केली.
सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे शिक्षण बँकेच्या कर्जावर सुरु होते. त्यामुळे ते कर्ज फेडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. तसे असूनही त्यांनी रिक्षा चालकांना इंसेटिव देण्याची जबाबदारी घेतली. आंनदाची गोष्ट ही की जी-ऑटो नावाच्या त्यांच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याला सप्ताह देखील झाला नाही आणि जाहिरातदार प्रायोजक वर्तमान पत्राचे संपादक यांनी त्याला प्रतिसाद दिला. इतरही अनेक रिक्षावाल्यांनी त्यात सहभागी होण्याची विचारणा केली, त्यामुळे १५वरून शंभर रिक्षावाल्यांच्या विस्ताराची योजना त्यांनी अंमलात आणली. वास्तव हे आहे की रिक्षा हे जाहीरात करण्याचे मोठे साधन आहे. त्यामुळे अनेक कंपन्यानी त्यासाठी रिक्षांवर जाहिराती देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी निर्मल यांनी मोठ्या प्रमाणात ही योजना सुरु करण्याचे ठरविले. त्यांनी तात्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संपर्क केला. मोदी यांना त्यांच्या योजनेचे स्वरुप आणि संकल्पना मान्य झाली. त्यांनी ही योजना सुरू करण्यासाठी येण्याचे मान्य केले.
निर्मल सांगतात की, “ मी ऐकले होते की मोदीजी सुधारणावादी आणि सकारात्मक मुख्यमंत्री आहेत, मी भेटीसाठी वेळ मागितला आणि मला माझ्या अपेक्षांच्या विपरीत केवळ १५ दिवसांत वेळ मिळाली.”
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या जी- ऑटो चे उदघाटन झाले आणि निर्मल यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला. केवळ १५ रिक्षाने सुरुवात करत आता ही संख्या २१हजार झाली आहे. आता केवळ अहमदाबाद नाही तर जी-ऑटोने गांधीनगर, राजकोट, सुरत, अहमदाबाद, गुरगाव आणि दिल्लीतही सेवा सुरु केली आहे. त्यासाठी खाजगी आणि सरकारी बँकानी मदत केली आहे. इंडियन ऑइल, एल आयसी, एचपी सारख्या सरकारी कंपन्यांनी त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून जबाबदारी घेतली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ कौतुकच केले नाही तर त्यांच्या या कार्याला अनेकप्रकारे मदत देखील केली. एका वेळी अदानी समूह देखील जी ऑटो सोबत जोडला गेला.
परंतू रिक्षा संघटनाच्या समोर रिक्षावाल्यांना जोडणे सोपे नव्हते. बहुतांश रिक्षावाले मनमानी करत होते. ग्राहकांशी दुर्वर्तन तर रोजचे होते. मिटर आणि ठरलेले भाडे नावापुरते होते आणि सर्रास लुट होत होती. जेंव्हा काही रिक्षावाले त्यांना येवून जोडले जात होते त्यावेळी त्यांच्या संघटनेच्या नेत्यांनी येवून धमक्या सुध्दा देण्यास सुरुवात केली. अनेकांना मारहानही झाली होती, मात्र ते निर्मल यांच्या मोहिमेचा भाग झाले होते. निर्मल सांगतात की, “ ज्यावेळी चांगले काम सुरु होते त्यावेळी त्याला सुरुवातीला विरोध हा होतच असतो. आमच्या बाबतही तेच झाले राग व्देष यातून अनेकाना त्रास झाला, काहींचे हात तोडण्यात आले. मात्र आमची एकजूट राहिली, आमचे नाव वाढत गेले. आमच्या रिक्षावाल्यांनी लोकांना वाईट वागणुक दिली नाही त्यामुळे त्यांना लोकांचा पाठिंबा होता. कधी कुणाचे सामान मागे राहिले तर ते लोकांना परत देण्यात येवू लागले. सर्वात मोठे म्हणजे इतर रिक्षांच्या तुलनेत आमच्या रिक्षात लोक येणे पसंत करु लागल्याने रिक्षावाल्यांना पहिल्या पेक्षा १५०-२०० रुपये जास्त मिळू लागले. त्यांना विमा संरक्षण मिळाले. आम्ही त्यातून अनेक माफिया समाप्त केले.”
सध्या निर्मल यांच्या या जी ऑटोचा आणखी विस्तार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ते सध्या सहा मोठ्या शहरात काम करत आहेत, आणि लवकरच त्यांना शंभर शहरात काम सुरु करण्याचे उद्दीष्ट आहे. याची त्यांना घाई मात्र नाही. ते ठोस योजना घेवून काम करत आहेत. ते मानतात की भारतात रिक्षाचा उपयोग कमी नाही, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळे कार आणि कँब आले तरी रिक्षाला मरण नाही. ते सांगतात की, “ येत्या काळात परिवहन क्षेत्राचा मोठा विकास होणार आहे. त्यामुळे आम्ही देखील आमच्या सेवा परिणामकारक कशा विस्तारता येतील यावर विचार करत असतो.
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “ स्पर्धा खूप आहे, त्यामुळे सेवा विस्तार करतानाच त्यात वैविध्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता अनेक कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या या क्षेत्रात काम करु लागल्या आहेत. आम्ही इतरांसारखे उत्पादन किंवा सेवा विकत नाही. आम्ही दर्जा देण्याला पसंती देतो.”
निर्मल यांना हे सांगताना अभिमान वाटतो की त्यांच्या कंपनीने जगातला परिवहनातील नवा सिध्दात मांडला आहे. ते हे सांगण्याचा प्रयत्न करतात की ओला आणि उबर त्यांच्यानंतर आले आहेत. अनेक गोष्टी ते अभिमानपूर्वक सांगतात. ते म्हणतात की, “देशात केवळ आमची अशी कंपनी आहे जिचा ताळेबंद सकारात्मक आहे. म्हणजे केवळ आम्हीच फायद्यात आहोत. त्यांच्यामते कुणाकडूनही पैसे न घेता त्यांचा उद्योग सुरु आहे.
खरेतर आपल्या उलाढालीचे आकडे सांगण्यास ते कचरतात मात्र आता हे जगजाहीर झाले आहे की त्यांच्या उद्योगाने पहिल्याच वर्षी १.७५ कोटीची उलाढाल केली आहे. त्यात २० लाखांचा नफा झाला. सुरुवातीला त्यांनी जी ऑटो या नावाने आणि नंतर निर्मल फाऊंडेशन या नावाने कंपनी चालविली. महत्वाचे म्हणजे त्यांनी सुरुवातीला फोनवरून रिक्षा नोंदणी देखील घेतली आहे, मात्र त्यांनतर कालानुरुप त्यांनी मोबाईल आणि इंटरनेट वरून नोंदणी घेण्यास सुरुवात केली आहे. जी ऍप देखील लोकप्रिय झाले आहे. निर्मल हस-या चेह-याने सांगतात की, “आम्ही आमचा अॅप घ्यावा म्हणून कुणाला सवलत दिली नाही, तरीही हजारो जणांनी तो डाउनलोड केला आहे.” जी अॅप स्वस्त आणि सुरक्षित आहे. याच घोषणेतून ते आपल्या यशाची कहाणी पुढे नेत आहेत. त्यांचे आणखी एक लोकप्रिय वाक्य आहे ‘एनी टाईम रिक्षा’ म्हणजे ‘एटीआर’ याद्वारे ग्राहक मोबाईल किंवा कॉलसेंटर वरून कधीही रिक्षा मागवू शकतात. निर्मल सांगतात की यासेवा ते रास्त दराने देतात आणि ठराविक भाड्यापेक्षा जास्त कधीही रिक्षावाले पैसे घेत नाहीत. त्यांच्या रिक्षात बिल देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चालकांने काही चूक केली तर तक्रार देण्याची सुविधा आहे. तक्रार योग्य असेल तर कारवाई केली जाते. त्यांच्या रिक्षात जीपीएस देखील आहे. त्यामुळे रिक्षा कोणत्या भागातून गेली ते सहजपणे समजते.
त्यांना विचारणा केली की नव्या उद्यमीना ते काय सांगू इच्छितात, त्यावर ते म्हणाले की, “ तुम्ही यासाठी उद्यमी बनू नका की कुणी दुसरा फार चांगले काही करतो आहे, त्यांचे पाहून बनायला जावू नका. मी वेगळे काही करेन असे वाटेल तरच उद्यमी बना, यश मिळेलच”.
ते म्हणाले की, “ माझे स्वप्न मोठे आहे. मला वाटते की या देशात लोक पुढील काळात रस्त्यात उभे राहून रिक्षा बोलावणार नाहीत. ते कुठेही बसून रिक्षा बुक करु शकतात. हेच माझे स्वप्न आहे. ज्या प्रमाणे आज लोकांना कोणे काळी टेलीफोन बुथ होते आणि तेथे रांगा असत हे सांगून खरे वाटत नाही त्याप्रमाणे येत्या काळात पूर्वी लोकांना रस्त्यावर जावून रिक्षा मिळते का ते पहावे लागे असे सांगून खोटे वाटावे अशी स्थिती येईल. मला वाटते की केवळ एक बटन दाबावे आणि रिक्षा यावी”.
व्यस्त जीवनात वेळ काढून त्यांनी लग्न सुध्दा केले, १०ऑक्टो.२० ०९मध्ये सिवान जिल्ह्यातील भगवानपुरच्या सारीपट्टी गावातील ज्योती यांच्याशी ते विवाहबध्द झाले. त्या देखील दिव्यांग आहेत. त्यांनी एमएससी मध्ये शिक्षण घेतले आहे, त्या सध्या निर्मल यांच्या व्यवस्थापनात मदत करतात.
दिव्यांगताबाबत बोलताना ते म्हणतात की, “ त्यांना कधी थेट तसे वाटले नाही की ते दिव्यांग आहेत. लहानपणापासून माझ्या सोबत जे होते त्यांनी मला तसे वाटू दिले नाही. त्यांचा मी ऋणी आहे. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मला नेहमी चांगली माणसे भेटली. माझ्या यशाचे श्रेयही मी त्यांनाच देतो.”
भारतात वाहन समूहाच्या क्षेत्रात क्रांती करणा-या निर्मलकुमार यांनी जी माहिती दिली ती अहमदाबाद येथे झालेल्या या मुलाखतीव्दारे खास अशीच होती. त्यांच्या मते देशात ५०लाख रिक्षा आहेत, त्यात २५ कोटी लोक रोज प्रवास करतात. तर केवळ २.५कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. तीन चाकी रिक्षा दिसायला छोट्या असतात मात्र देशात ७५लाख लोकांच्या उदरनिर्वाहाचे ते साधन आहे. महत्वाचे म्हणजे देशाच्या आर्थिक-सामाजिक रचनेत त्याचे मोठे स्थान आहे. चार चाकी गाड्यांच्या तुलनेत त्या सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांची ओळख कधी हरवणार नाही. लोकांचे म्हणणे आहे की रिक्षावाले वर्तन चांगले ठेवत नाही, मनमानी करतात, मात्र ते संघटीत झाले प्रशिक्षित झाले आणि त्यांनी व्यावसायिक म्हणून लोकांशी चांगले वर्तन ठेवून व्यवसाय केला तर त्यांचा सन्मान होतो आणि त्यांच्यावरही लोक विश्वास दाखवु शकतात हेच निर्मलकुमार यांच्या या उपक्रमाचे यश आहे.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.