आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात 'तिच्या ' आकांक्षां पुढती गगन ठेंगणे : विद्या लक्ष्मण
ही गोष्ट एका अशा महिलेची आहे, ज्यांनी संगणक(कम्प्युटर)विश्वात स्वत:ची अशी वेगळी आणि यशस्वी ओळख निर्माण केली. पण त्याहूनही अधिक त्या इतर शेकडो मुलींसाठी आदर्शवत (रोल मॉडल) ठरल्या आहेत. त्यांनी शेकडो मुलींसमोर यशस्वी कसं व्हायचं याचं जिवंत उदाहरणच ठेवलं. त्यांचा निर्धार पक्का होता. आणि त्याच निर्धाराच्या जोरावर त्यांनी यशाचं शिखर सर केलं..स्वप्नवत वाटावं असंच.
१९८९ ची गोष्ट..विद्या लक्ष्मण कम्प्युटर सायन्स विषयाचं शिक्षण घेत होत्या. टेक्नोलॉजी अर्थात तंत्रज्ञान क्षेत्राचं त्यांना विशेष आकर्षण होतं. विद्या लक्ष्मण यांनी त्या काळात तंत्रज्ञान विश्वात करिअर करण्याचा निर्णय घेतला, ज्यावेळी या क्षेत्रात येणा-या मुलींचं प्रमाण नगण्य होतं. मुलींची हीच विचारसरणी त्यांना बदलायची होती. त्या शेकडो मुलींना सोबत घेऊन त्यांना या क्षेत्रात नाव कमवायचं होतं. विद्या लक्ष्मण यांनी आर. व्ही.कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्या सांगतात, ''त्यांच्या बॅचची एकूण विद्यार्थीसंख्या होती तीन हजार. पण त्यात फक्त ५४ मुली होत्या. आणि त्यातही फक्त अठराच मुलींनी कम्प्युटर सायन्सची पदवीसाठी निवड केली होती. पण हा इतका मोठा आणि प्रस्थापित पद्धतीशी बंड करणारा निर्णय घेण्याचं खरं श्रेय विद्या त्यांचे वडील आणि भावाला देतात. या दोघांनीही सुरुवातीपासूनच विद्या लक्ष्मण यांच्यातल्या कम्प्युटर टेक्नोलॉजीमधील आवडीला प्रोत्साहन दिलं. गंमत म्हणजे त्यांच्या भावालाही टेक्नोलॉजीची खूप आवड होती. इतकी की ते मिळेल ती वस्तू कशी तयार केली असावी हे पहाण्यासाठी ती पूर्णपणे उघडून ठेवायचे. आणि नंतर विद्या त्या वस्तू पुन्हा जोडायच्या.
विद्या लक्ष्मण यांचे वडील लष्करात होते. त्यामुळे घरातलं वातावरण कडक शिस्तीचं. पण त्याहूनही वेगळी गोष्ट म्हणजे त्यांच्या वडिलांची नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत रहायची. त्यामुळे त्यांचं कुटुंब कायम नवनवीन ठिकाणी स्थलांतर करत राहिलं. विद्या सांगतात, प्रत्येक शहराची स्वत:ची अशी एक पद्धत होती, एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्या कुटुंबाला प्रत्येक शहराशी मिळतं जुळतं घ्यावं लागायचं, तिथली रहाणीमानाची पद्धत अंगीकारावी लागत होती. आणि याच सवयीचा फायदा त्यांना टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात काम करताना झाला. त्या म्हणतात, “टेक्नोलॉजी क्षेत्रामध्येही सतत बदल घडत असतात, नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत असतं. पण त्यांच्या सतत स्थलांतर आणि नव्या पद्धतींना आत्मसात करण्याच्या सवयीमुळे त्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात सतत होणारे नवनवे बदल आत्मसात करायला अडचण आली नाही.” त्या सांगतात त्या दिवसांमध्ये त्यांच्यासमोर कोणतीही महिला रोल मॉडेल नव्हती. त्या ज्या कुठल्या क्षेत्राचा विचार करायच्या, त्या क्षेत्रात त्यांना पुरूषच वरच्या पदांवर कार्यरत असलेले दिसायचे. आणि याच गोष्टीमुळे व्यथित आणि प्रेरित होऊन विद्या लक्ष्मण यांनी ठरवलं की त्या महिलांसाठी एक रोल मॉडेल बनतील आणि या क्षेत्रात पुढे येण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देतील.
असं म्हणतात की, यश कधीही सहजासहजी मिळत नाही, आणि जे मिळतं, तो फक्त यशाचा आभास असतो, ते यश चिरकाल टिकणारं नसतंच मुळी. खरं यश मिळवण्यासाठी खडतर मेहनत करावी लागते. आणि विद्या याच विचाराने चालणा-या होत्या. त्या सांगतात की, जेव्हा त्या ८ महिन्यांच्या गर्भवती होत्या, तेव्हाही त्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ त्यांच्या कंपनीसाठी दिला होता. साहजिकच आहे की, त्यांच्या या मेहनतीची दखल त्यांच्या संस्थेनं घेतली आणि त्यांना पुढच्या वाटचालीमध्ये सकारात्मक पाठिंबा दिला. पण त्यांचा हा वैयक्तिक अनुभव फक्त त्यांचाच नसून इतरही अनेक महिलांचा असल्याचं त्या म्हणतात. त्या सांगतात, “काम करणा-या महिला नेहमीच एक आई म्हणून स्वत:ला दोष देत असतात. त्यांना याचं कायम वाईट वाटत असतं की त्या त्यांच्या मुलांचं व्यवस्थित पालन-पोषण करू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाहीत. पण अशावेळी संबंधित महिलेनं, तिच्या कुटुंबियांनी आणि ती काम करत असलेल्या संस्थेनंही थोडा व्यापक विचार करणं गरजेचं आहे. या तिघांनीही एकमेकांना सहकार्य करायला हवं, समजून घ्यायला हवं. त्यातूनच या अडचणीवर तोडगा काढता येऊ शकतो. शिवाय संस्था व कर्मचा-यांमध्ये चांगले संबंधही दृढ होऊ शकतात.”
यासाठी विद्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या एका घटनेचं उदाहरण देतात. २००१ मध्ये जेव्हा त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या, तेव्हा त्या एका कंपनीमध्ये इंटरव्यू(मुलाखत)साठी गेल्या. ही कंपनी आणि त्यात होणारा त्यांचा इंटरव्यू ही विद्या यांच्यासाठी कोणती साधी गोष्ट नव्हती. ते त्यांचं स्वप्न होतं. पण दुर्दैवानं ते स्वप्न अपुरंच राहिलं. त्यांच्या गर्भावस्थेमुळे त्यांना ती नोकरी मिळू शकली नाही. या घटनेमुळे त्यांना फार दु:ख झालं. पण या नाजूक क्षणी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना धीर दिला, त्यांच्या पाठिशी ते ठामपणे उभे राहिले.
विद्या लक्ष्मण यांनी आयुष्यात कधीच कोणत्याच संकटासमोर हार मानली नाही. त्यांचा निर्धार पक्का होता, आणि त्याच ठाम निर्धाराच्या जोरावर या यशाच्या शिखराच्या दिशेनं एक एक पाऊल टाकत गेल्या. त्यांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर आज त्या बंगळुरूमध्ये ‘टेस्को’ कंपनीच्या एक यशस्वी संचालिका आहेत. त्याशिवाय ‘अनीता भोग इंस्टिट्युट’च्या उपाध्यक्षही आहेत. भारतात हजारो-लाखो अशा महिला आहेत ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय आणि त्यासाठी आजही त्या मोठ्या अडचणींचा सामना करतायत. अशा सर्व महिलांसाठी विद्या लक्ष्मण या एक प्रेरणास्त्रोत आहेत. आज विद्या लक्ष्मण यांच्या यशाचा थक्क करून सोडणारा प्रवास पाहिल्यावर कुणाचाही या गोष्टीवर सहज विश्वास बसेल की जर महिलांनी ठरवलं तर त्या आकाशही जमिनीवर आणू शकतात, त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही !