गरीबांच्या शिक्षणासाठी लोकल ट्रेनमध्ये ‘दान’ मागणारा प्रोफेसर...
मुंबईच्या लोकलमध्ये एक चांगले कपडे घातलेला व्यक्ती चढतो. अस्खलित इंग्रजी, मराठी आणि हिंदीत अश्या तीनही भाषेत गावातल्या मुलांसाठी शाळा बांधण्याचं स्वप्न बोलून दाखवतो. काही मिनिटात त्याच्या हातात बऱ्या पैकी पैसे जमा होतात. मग तो पुढच्या डब्यात जातो तिथंही हे असंच चित्र पहायला मिळतं. हे आहेत संदीत देसाई. संदीप मरीन इंजिनियर आहेत आणि ते एस.पी जैन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेन्ट एन्ड रिसर्चमध्ये प्रोफेसरची नोकरी करत होते. संदीप यांना कामाचा भाग म्हणून एक सोशल वर्क प्रोजेक्टची तयारी करायची होती. ते त्या प्रोजेक्टचे प्रमुख होते. याचवेळी प्राथमिक शाळेतल्या दुरवस्था त्याच्या नजरेस पडली. संपूर्ण देशात हीच परीस्थिती आहे. यामुळे आपल्याला काही करता येईल का याची चाचपणी सुरु झाली. यातुनच त्याच्या या अनोख्या समाजसेवेच्या कामाला सुरुवात झाली.
संदीप मुळचे रत्नागिरीचे. सुट्टीत इतर चाकरमान्यांप्रमाणे ते गावाकडे जायचे. तिथल्या शाळेत जाऊन लहान मुलांना शिकवायचे. मग शिक्षणाचा हा वसा देण्याचं काम महाराष्ट्रभर सुरु झालं. २००१ मध्ये त्यांनी श्लोक पब्लिक ट्रस्ट नावाची संस्था बनवली. रिसर्च आणि सेमिनारमधून मिळणाऱ्या पैश्यातून या संस्थेचा कारभार सुरु होता. प्राथमिक शाळेतल्या मुलांना सर्वोपरी मदत करण्याचं काम ते करत होते. २००७ मध्ये त्यांनी नोकरीही सोडली. आता गरीब मुलांसाठी शाळा सुरु करण्याचा मनसुबा होता. त्यासाठी पैसे लागणार होते. हातात नोकरी ही नाही, मग त्यांनी २६ सप्टेंबर २०१० ला पहिल्यांदा या मुलांच्या शाळेसाठी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये पैसे मागायला सुरुवात केली.
सुरुवातीला लोकांना विश्वास बसायचा नाही. लोक त्यांच्या प्रोजेक्ट विषयी प्रश्न विचारायचे. जमा केलेला एक ही पैसा स्वत:च्या खर्चासाठी नाही तर फक्त गरीब मुलांच्या शाळेसाठी जाईल याची हमी ते देत. पैसे येत गेले. एक प्रोफेसर शाळेसाठी पैसे मागतोय हे लक्षात आल्यावर अनेकांनी सढळ हातांनी मदत केली आणि याच्याच जोरावर त्यांनी २०१२ मध्ये यवतमाळमध्ये आपली पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा उघडली.
त्यानंतर लागलीच राजस्थानमध्ये अशा तीन शाळा उघडल्या. या शाळेत येणाऱ्या गरीब मुलांना पुस्तकं, वह्या आणि शाळेचा गणवेश मोफत मिळतो. या सर्व ठिकाणी मिळून सध्या १२ मुलं शिक्षण घेत आहेत. हे सर्व शक्य झालं लोकल ट्रेनमधून आलेल्या पैश्यातून.
संदीप सांगतात गरीब मुलांना अशी शैक्षणिक मदत करण्याची प्रेरणा त्यांना आईकडून मिळाली. ती सुमारे ३० वर्षे गरीब मुलांना विनामुल्य शिकवायची. आपण शिकलो, मार्गी लागलो. जगभरात फिरलो आता समाजाला या शिक्षणाचा फायदा व्हायला हवा. मदतीसाठी स्वत:कडे पैसे असलेच पाहिजे असं नव्हे. मदत करणाऱे हजारो हात पुढे येतात.
आत्तापर्यंत त्यांनी लोकल ट्रेनमध्ये पैसे मागून सुमारे एक करोड पेक्षाही जास्त निधी गोळा केलाय. या प्रयत्नात त्यांनी आरपीएफनं अनेकदा गजाआडही केलंय. पण त्यांचा हेतू लक्षात आल्यावर सुटकाही झाली. आता संदीप लवकर पाचवी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करणार आहेत. रत्नागिरीत ही शाळा असेल. गरीब मुलांसाठी देशभर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्याची त्यांची इच्छा असल्याचं ते म्हणतात. मुंबईतल्या लोकलमध्ये त्यासाठी पुन्हा हात फैलावल्यानंतर मदत मिळणारच यावरही त्यांना दृढ विश्वास आहे.