अमेरिकेतून शिक्षण घेऊनही देशातल्या शेतक-यांना शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचे धडे देणारे, “चंद्रशेखर भडसावळे” !
महाराष्ट्रात सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दुष्काळाची आणि अडचणीत असलेल्या शेतक-यांच्या प्रश्नांची. सरकार आणि काही सेवाभावी संस्था त्यासाठी कामे करताना दिसत आहेत. पण गेल्या ४० वर्षांपासून चंद्रशेखर भडसावळे हे शेतकरी कसा सुखी होईल, कमी खर्चात त्याला जास्त उत्पादन देणारा फायद्याचा शेतीव्यवसाय कसा करता यईल यासाठी अविरतपणानं काम करत आहेत. राज्य सरकार आणि अनेक शेतकरी त्यांच्या आधुनिक शेतीच्या प्रयोगांचे मार्गदर्शन घेत आहेत. आजच्या काळात किफायतशीर शेतीउदयोग कसा करता येईल याचे स्वत:च्या यशस्वी प्रयोगातून शेतक-यांना उदाहरण घालून देणा-या भडसावळे यांच्या शेतीप्रयोगांची माहिती घेण्यासाठी युअर स्टोरीने त्याच्याशी बातचित केली आणि त्यांच्या शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांची माहिती घेतली.
रायगड जिल्ह्यातील नेरळ रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या मालेगाव येथे सगुणा या आपल्या आजीच्या नावाने भडसावळे यांनी हे आधुनिक शेतीप्रयोग केंद्र सुरू केले. आज त्यांचे शेतक-यांना मार्गदर्शन करणारे केंद्र आणि कृषी पर्यटन केंद्र असे स्वरुप पालटले आहे. आपल्या शेतात मत्स्यशेती, वनशेती, फळबाग, भाजीपाला, दुग्धोत्पादन, भुईमुगासारखी अपारंपरिक पिके घेताना सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक पाठबळ देणारा कृषी जोड व्यवसाय म्हणजेच कृषी पर्यटन आहे हे त्यांनी सिद्ध केले. शहरी भागातील लोकांनाही पर्यटनाच्या माध्यमातून या केंद्राची भुरळ पडते तर स्थानिक शेतकरी येथे आधुनिक पध्दतीने कशी फायद्याची शेती कमी श्रम आणि पैश्यात करता यईल ज्यातून भरघोस उत्पन्न मिळवता यईल याचा अभ्यास करण्यासाठी येथे येतात.
अमेरिका ते सगुणा बागचा प्रवास
मुंबई नजीकच्या कर्जत आणि नेरळच्या मध्ये वसलेल्या या सगुणा बागेमध्ये कृषी पर्यटनाचं एक आगळं वेगळं केंद्र गेल्या ४० वर्षापासून सुरु आहे. कृषी आणि ग्रामीण जीवनाचा वेगळा आनंद देणारी ही संकल्पना अमेरिकेतून आलेल्या चंद्रशेखर भडसावळे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा भडसावळे यांनी सुरु केली होती. त्यांच्या या अनोख्या वाटचालीची कहाणी युवर स्टोरीला सांगताना ते म्हणाले की, “१९७६ पासून सुरु झालेला हा प्रवास शेतीला प्रतिष्ठा देण्याच्या एका वेगळ्या हेतूने सुरु झालेली ही सगळी वाटचाल आहे. अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्यानंतर तिथे स्थायिक होण्याची सगळी स्वप्न समोर असताना हिरव्या स्वप्नांची भूल पडली आणि मुंबई नजीकच्या नेरळ मध्ये एक आगळी वेगळी सगुणा बाग फुलली.”
“ दापोली कोकण कृषी विद्यापीठातून बीएससी अॅग्रीकल्चर केल्यानंतर जेव्हा मी इथून अमेरिकेत जाणार होतो तेव्हा इथल्या सगळ्या माझ्या मित्र मंडळीना वाटत होतं की हा एवढा गरीब मुलगा अमेरिकेत कसं काय जाईल. त्यामुळे ते सगळे हसत होते आणि मी खरंच अमेरिकेत गेलो. फूड टेक्नोलॉजी मध्ये एमएस केलं. शिक्षणानंतर वडिलांच्या शब्दाखातर जेव्हा मी भारतात परतणार असल्याचे माझ्या मित्रमंडळीना सांगितले तेव्हा तिथल्या अनेकांनी माझी मस्करी केली”. भडसावळे यांनी सांगितले.
१९७६ साली ते जेव्हा परत आले तेव्हा भारतात आणीबाणीची परिस्थिती होती. ते म्हणाले की , “ ज्या वेळेला आम्ही इथं आलो तेव्हा ओसाड, काटेरी जमीन होती. लोकं आम्हाला सगळे हसत होते. ज्यावेळेला आमच्याकडे कोणी पाहुणे मंडळी आली तेव्हा चार सारखे पेले किवा चार सारखे कप द्यायला नव्हते अशा परिस्थितीतून ही सुरवात झाली.
दहा वर्ष संघर्षाचा काळ
आम्ही सुरवातीला निराशेच्या खोल खोल दरी मध्ये पडत गेलो की जीवनामध्ये काही अर्थ आहे असं वाटत नव्हतं. कारण काम खूप होतं पण कामाच्या यशाला पावती मिळत नव्हती. ती पावती म्हणजे प्रतिष्ठेची. साधारण शेतकऱ्याचा संघर्ष प्रतिष्ठेसाठीच असतो. प्रतिष्ठेची लढाई ही प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा याच्या अगोदर प्रतिष्ठा पाहिजे आणि ती प्रतिष्ठा मला काल जेवढी मिळाली किमान तेवढी आज किंवा त्यापेक्षा कणभर जास्तही, ती सतत वाढती राहिली पाहिजे. त्यापेक्षा कमी होता कामा नये. कमी झाली आणि कमीपणा मध्ये जर सातत्य आलं तर माणूस भयंकर निराश होतो आणि जीवनाला कंटाळतो तेव्हा प्रतिष्ठा फार महत्वाची आहे. ती शेतकऱ्याला मिळत नाही. आम्ही दोघे तर अत्यंत प्रतिष्ठित जगातन इथं आलो होतो तेव्हा आम्हाला वाटत होतो आम्ही आता हिरो बनायला हवं होत. कारण ग्रामीण भागाला पुढे नेण्यासाठी, बदलण्याची काहीतरी वेगळी दृष्टी आमच्याकडे होती. ते काम करत असताना निदान त्रास नको, अडचणी नको असं वाटत होत. पण प्रत्यक्षात अगदी उलटं होत होतं. “भडसावळे सांगत होते.
संपूर्ण समाज अगदी इथल्या स्थानिक लोकांपासून सगळ्या जणांनी खूप त्रास दिला. म्हणजे शेतात काही प्रयोगादाखल लावायचो त्याच्यामध्ये गुरढोरं घालण्यात येत होती. किंवा तिथे वणवा पेटवायचा किंवा ते उपटून फेकून द्यायचं आणि असं सगळं जे होतं, हे थोडं नाही दहा वर्ष चाललं. त्यामुळे शेवटी जीवनाला कंटाळलो होतो म्हणजे काहीही करण्याची इच्छा नव्हती.. हे सगळं करत असताना अगदी शेवटही निराशा झाली.
कृषी पर्यटनाचा जन्म
“ त्यानंतर काही दिवसांनी आमच्याकडे गावातले काहीजण आले आणि म्हणाले की, आमच्याकडे मुंबईचे पाहुणे आले आहे. आम्ही तुमच्या त्या झाडाखाली बसू का ? त्यावेळी फारशी झाडं नव्हती आमच्याकडे. ते सर्व जण झाडाखाली जाऊन बसले आणि खुश झाले. मग मी त्यांना विचारलं की, 'हे झाड कसलं आहे माहित आहे का' ? ते करंजाचे झाड होते आणि त्यांना माहिती नव्हती. त्यांना माहिती दिली ते आणखीन खुश झाले आणि आपल्या देशात त्यावेळी, त्यादिवशी कृषी पर्यटनाचा जन्म झाला. त्यानंतर पुढचे चार वर्ष आमच्याकडे पाहुणे येत राहिले आम्ही त्यांच्याकडून काहीही घेत नव्हतो. पैसे न घेता उपक्रम चालू राहिला. मग आमच्या एका शिक्षकाने मला एक पुस्तक दिले ‘अग्रो टुरिझम इन ऑस्ट्रेलिया’ अॅग्रो आणि टुरिझमच्या शब्दाचा मग कृषी आणि पर्यटन हा शब्द सापडला आणि तेव्हा त्याची व्याख्या सापडली ती अशी, “स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेलं, आनंददायी शिक्षण व मौज यांचा सहज सुंदर मिलाफ म्हणजे कृषी पर्यटन” अशी फळती फुलती शेती मी जेव्हा पाहुण्यांना दाखवतो तेव्हा मला प्रतिष्ठा मिळते आणि पाहुण्यांना आनंद," भडसावळे सांगत होते.
शहरातली जी लोकं आहे ती शेतीपासून आणि निसर्गापासून तुटलेली आहे. त्यामुळे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कृषी पर्यटनाची अनेक केंद्र महाराष्ट्रात सुरु झाली आणि बंदही पडली मात्र सगुणा बागेचे सातत्य कायम आहे. येणाऱ्या लोकांचं प्रमाण कायम आहे, प्रतिष्ठा कायम आहे. त्याला आता सर्व जगभरातून मान्यता मिळायला लागली आहे.
सगुणा राईस तंत्र
सगुणा राईस तंत्र हे भातशेतीशी संबंधित नांगरणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यावर टोकण पद्धतीने लागवड करून उत्तम भात पिकवण्याचे नवे तंत्र भडसावळे यांनी संशोधित व विकसित केले आहे. यामुळे मशागत, बियाणे, मजुरी आदी खर्चात बचत होऊन उत्पादन आणि जमिनीच्या सुपिकतेमध्येही वाढ होते. या तंत्रात शेतीची मशागत व गादीवाफे एकदाच करायचे आणि मग या कायमस्वरूपी गादीवाफ्यांवर एका मागून एक अशी फेरपालट पिके घ्यावयाची भडसावळे २०१० पासून या तंत्राने शेती करत आहेत.
त्यांच्या मते या तंत्राचे फायदेच फायदे आहेत. चिखलणी व लावणी न करायला लागल्यामुळे ३०-४० टक्के खर्च आणि ५० टक्के त्रास कमी होईल. चिखलणी करताना वाहून जाणाऱ्या सुपीक मातीची धूप वाचेल व पुढच्या पिढीच्या हातात सुपीक जमीन देता येईल. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. गांडुळांची संख्या वाढते. रोपांमधील योग्य अंतरामुळे हवा खेळती राहते. गांडुळांमुळे जमीन भुसभुशीत राहते. गादी वाफ्यामुळे कमी पावसात पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. अति पावसात शेतात पाणी साचून राहत नाही. गादीवाफ्यावर भातपिकानंतर नांगरणी न करता फेरपालटीची पिके घेता येतात. दोन पिकांमधील मशागतीचा वेळ आणि खर्च वाचतो. एकदाच केलेले हे गादीवाफे ८-९ वष्रे वापरता येतात.
सगुणा राईस तंत्र हे आता सर्वसामान्य शेतकऱ्याला आत्मविश्वास आणि बळीराज्याला खऱ्या अर्थाने बलवान करणारं ठरलं आहे. त्यातून अनेक तरुणांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळाली आहे.
चंद्रशेखर भडसावळें हे गेल्या चार ते पाच वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत एस.आर.टी पद्धत पोचवण्याचं काम करत आहे. शेतकऱ्यांना या पद्धतीचा चांगलाच फायदा झाला आहे. शेतीच्या या आधुनिक प्रयोगासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिऴाले आहेत. अनेक ठिकाणचे शेतकरी हे तंत्र त्यांच्याकडून आत्मसात करत आहेत. त्यांच्या या कार्याला युअर स्टोरीचा सलाम. 'बळीराजा जगला तरच हा देश जगेल' त्यासाठी त्याला संकटातून बाहेर काढणा-या भडसावळे यांच्या सारख्याचे योगदान नक्कीच मोलाचे आहे.
वेबसाईट :http://www.sagunabaug.com/
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :