जीवनात सर्वांना पुढे गेलेले पाहू इच्छिते ‘शालिनी’; एक कल्पना बदलेल गरजूंचे आयुष्य!
एक मुलगी, जिला सुचली एक अनोखी कल्पना आणि आता त्याच कल्पनेमुळे लवकरच अशा लाखो लोकांचे जीवन बदलणार आहे, जे आपल्या दररोजच्या गरजेसाठी वॉकरचा वापर करतात. बिहारच्या पटनामध्ये राहणा-या शालिनीकुमारी यांनी एका अशा वॉकरची निर्मिती केली आहे, ज्याच्या समोरील दोन पाय लहान- मोठे केले जाऊ शकतात. याप्रकारे या बदल करता येणा-या वॉकरमुळे याचा वापर करणारी व्यक्ती त्याला घेऊन केवळ इकडे-तिकडे जाणेच नव्हेतर, पाय-या देखील चढू शकते. आपल्या या कल्पनेमुळे शालिनी यांनी अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. वर्ष २०१६च्या सुरुवातीस हे वॉकर सहजरित्या बाजारात उपलब्ध होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे.
शालिनी बिहारची राजधानी पटना येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढल्या आणि सध्या त्या डॉक्टर बनण्यासाठी परीक्षांची तयारी करत आहेत. ‘युअर स्टोरी’ला त्यांनी सांगितले की, “मला वॉकर बनविण्याची कल्पना माझ्या आजोबांकडे बघून सूचली, जे वॉकरचा वापर करायचे. तेव्हा मी बघायचे की, त्यांना वॉकरवर चालताना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करायला लागत होता. जसे ते वॉकरच्या सहाय्याने पाय-या चढू शकत नव्हते. जर मागे वळायचे असेल तर त्यांना समस्या येत होत्या. अशा प्रकारे त्यांच्या अनेक समस्यांना मी पाहिले आणि समजले देखील.”
त्यानंतर त्यांनी विचार केला की, जर या वॉकरमध्ये थोडे फेरबदल केले तर, समस्या येणार नाहीत. ज्यानंतर त्यांनी वॉकरच्या (डिझाइन)आरेखनावर काम करण्यास सुरुवात केली.
शालिनी यांनी एका नंतर एक अनेक प्रकारच्या डिझाइन तयार केल्या, मात्र बहुतांशमध्ये काहीतरी कमतरता बघायला मिळायची. शालिनी यांच्या मते, त्या ८व्या इयत्तेत होत्या तेव्हापासूनच त्यांनी नक्षीवर काम करण्यास सुरुवात केली होती. अखेर खूप प्रयत्नानंतर त्यांच्या डोक्यात कँमेरा ट्रायपॉडची आकृती सुचली. ज्याला लक्षात ठेवून त्यांनी वॉकरसाठी नवी आरेखने तयार केली. जेणेकरून त्याला लहान मोठे करता येऊ शकेल. त्याव्यतिरिक्त त्यांनी वॉकरला अनेक प्रकारच्या सुविधांनी सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या या कल्पनेला तेव्हा गती मिळाली, जेव्हा त्यांनी त्याला गुजरातच्या अहमदाबादमध्ये ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ समोर मांडले. त्यानंतर तेथे त्यांच्या बनविलेल्या आरेखनावर अजून काम करण्यात आले. ज्यानंतर वॉकरसाठी बनविण्यात आलेल्या त्यांच्या आरेखनात काही बदल करण्यात आले आणि जेव्हा ते बनून तयार झाले, तेव्हा शालिनी यांना अहमदाबाद येथे बोलाविण्यात आले. आज या वॉकरच्या नक्षीवर काम पूर्ण झाले आहे. या वॉकरमध्ये असलेले सौंदर्य पाहून नागपूरच्या एका कंपनीने या प्रकल्पाला विकत घेतले. ज्यानंतर कंपनीने शालिनी यांनी बनविलेल्या नक्षीवर वॉकर बनविण्याचे काम सुरु केले. शालिनी यांच्या मते, हे वॉकर लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे आणि याच्या किमतीबाबत त्यांचे म्हणणे आहे की, हे जवळपास अडीच हजार रुपयाचे असेल.
या वॉकरला बनविण्यात एल्युमिनियमचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हे वॉकर वापरण्यात खूपच हलके आहे आणि खूपच आरामदायक देखील आहे. याव्यतिरिक्त या वॉकरमार्फत डाव्या, उजव्या कुठल्याही दिशेला जाता येते. इतकेच नव्हे तर, पाय-यांवर सहज चढता-उतरता येऊ शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या वॉकरमुळे पाय-या चढता-उतरता येत नाहीत. मात्र, या वॉकरने हे काम सहज बनविले आहे. शालिनी यांच्या या कामाला केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील खूप नावाजण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना अनेक सन्मान देखील मिळाले आहेत.
नव्या पद्धतीचा वॉकर तयार करण्यासाठी शालिनी यांना सर्वात पहिले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सन्मानित केले. तर २०१५च्या सुरुवातीस शालिनी यांना स्टूडेंट काउंसिल पुरस्काराने देखील नावाजण्यात आले आहे. त्यांच्या या उपलब्धीसाठी त्यांना केवळ देशातच नव्हे तर, देशाबाहेरही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शालिनी यांना दक्षिण कोरियाच्या एका संस्थेने त्यांच्या या उपलब्धीसाठी बिजनेस मॉडेल पुरस्काराने सन्मानित केले. आता शालिनी यांचा प्रयत्न आहे की, त्यांनी तयार केलेले हे वॉकर प्रत्येक गरजूंपर्यंत सहजरित्या पोहोचावे, जेणेकरून त्यांच्या चालण्या-फिरण्याची समस्या थोडी कमी होऊ शकेल.
लेखक : हरिश बिश्त
अनुवाद : किशोर आपटे.