स्वत:मधील नेतृत्वगुण ओळखून ते विकसित करा - रतन टाटा महाराष्ट्र शासनाचे टाटा ट्रस्ट सोबत महत्वपूर्ण करार सामाजिक विकासाच्या निर्देशांकासह राज्याच्या प्रशासनात विशेष सुधारणा
युवकांनी स्वत:मधील नेतृत्व गुण ओळखून ते स्वत: विकसित करावेत, असे आवाहन टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी केले, विधानभवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री इंटर्नशिप कार्यक्रमातील (CM Internship Program) विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. टाटा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान, टाटा ट्रस्टचे अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना श्री. रतन टाटा यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या रिषद सुरती या विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना रतन टाटा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडत असून या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासनातील अनेक बाबींचे ज्ञान या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये युवकांचा मोठा सहभाग असणे आवश्यक असल्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या विस्तारत असणाऱ्या ई- कॉमर्स क्षेत्रामुळे उत्पादन क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाबद्दल रोहन वोरा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रतन टाटा म्हणाले की, ई-कॉमर्स क्षेत्र हे अत्यंत महत्वपूर्ण क्षेत्र असून यामुळे आर्थिक वृध्दी आणि रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ई-कॉमर्स या क्षेत्राला सध्या जगामध्ये प्रचंड मागणी असल्याचेही रतन टाटा म्हणाले.
वार्तालापाच्या समारोपाप्रसंगी बोलतांना प्रशिक्षणार्थी अक्षय गुजर म्हणाले की, या उपक्रमामध्ये टाटा ट्रस्टचा देखील महत्वाचा सहभाग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुभवाचा उपयोग आम्ही समाजाच्या प्रगतीसाठी करणार असून आमच्यावर दाखविलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू .
मुख्यमंत्री इंटर्नशिप कार्यक्रमाबद्दल:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत युवकांना सामावून घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या युवकांना महत्वपूर्ण अनुभव मिळवून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामध्ये सात विद्यार्थींनीसह ३६विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांपैकी मुख्यमंत्री कार्यालयातील वॉररुममध्ये ८, मुख्यमंत्री कार्यालयात ५, विविध विभागांत ३, जिल्हाधिकारी कार्यालयात १०, महानगर पालिका ३, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात २, सिडको ३ आणि महावितरणमध्ये २ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कुपोषण निर्मुलन, स्त्री सक्षमीकरण यासह अन्य उद्दिष्टांच्या पुर्ततेतून राज्याच्या सामाजिक विकासाच्या निर्देशांकासह प्रशासनात विशेष सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्यात आज विविध महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
त्या नंतर विधान भवनात टाटा ट्रस्ट सोबत याबाबतचे नऊ सामंजस्य करार करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली. यावेळी टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा हे विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत आवर्जून उपस्थित होते.
राष्ट्रीय कर्करोग ग्रीड
यासंदर्भात निवेदन करतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय कर्करोग ग्रीड तयार करण्यात येऊन त्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय विद्यालये, महाविद्यालये समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून कर्करोगाचे अत्याधुनिक पद्धतीने निदान व उपचाराच्या सेवा देशात सर्वप्रथम राज्यात उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर शासकीय यंत्रणेमार्फत बोनमॅरो रजिस्ट्री स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. त्यामुळे रक्ताचा कर्करोग,सिकलसेल, थॅलेसेमिया अशा स्वरूपाच्या दुर्धर आजारांच्या उपचार पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होईल. या ग्रीडद्वारे पुढील ३ वर्षामध्ये ५० हजार बोनमॅरो दात्यांची निवड करण्यात येणार आहे.
कुपोषणमुक्तीसाठी पोषक आहार पुरवठा
महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्कृष्ट रुग्णालय माहिती प्रणाली विकसित करण्यात येणार असून या प्रणालीमार्फत रुग्णांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. राज्यातील कुपोषण कमी करण्यासाठी विविध जीवनावश्यक सूक्ष्म पोषण द्रव्यांचा आहारात समावेश (food fortification) करण्यात येणार आहे. यामुळे आवश्यक जीवनसत्वे, लोह व इतर आवश्यक अन्नद्रव्ये यांचा योग्य त्या प्रमाणात आहारात समावेश झाल्याने कुपोषण कमी होण्यास मदत होणार आहे.
प्रभावी आरोग्यसेवेसाठी सल्लागार यंत्रणा
सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी स्ट्रॅटेजीक हेल्थकेअर ॲडव्हायजरी युनिट स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. तसेच मानसिक आरोग्य ही एक महत्त्वाची समस्या असल्यामुळे नागपूर येथील मनोरुग्णालयात सेंटर ऑफ एक्सलन्स विकसित करण्यात येणार आहे व हे केंद्र या स्वरुपाचे देशातील पहिले केंद्र होणार असून ते राज्यासह देशात मॉडेल म्हणून वापरण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य औषध पुरवठा महामंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने लागणारे सर्व तांत्रिक व व्यवस्थापकीय सहाय्य उपलब्ध होणार आहे. या महामंडळामार्फत सर्व रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयात उत्कृष्ट दर्जाची मोफत औषधे पुरवण्याची हमी देण्यात येणार आहे. नेट साथी`द्वारे महिला सक्षमीकरण
महिलांमध्ये संगणक व इंटरनेट यांच्या प्रशिक्षणासाठी इंटरनेट साथी म्हणून एक विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे महिलांमध्ये संगणक साक्षरता वाढवून त्याद्वारे महिला सक्षमीकरण घडवून आणण्याचा उद्देश आहे. इंटरनेट साथींच्या माध्यमातून महिलांना संगणक व इंटरनेट यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात बचतगटात काम करणाऱ्या तीनशे महिलांना प्रशिक्षित करुन त्यांच्या माध्यमातून १२०० गावांतील महिलांना ही सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यापुढील टप्प्यात १५ हजार खेड्यांमध्ये हा कार्यक्रम विस्तारण्यात येणार आहे. अशा पद्धतीने पुढील तीन वर्षात राज्यातील प्रत्येक खेड्यापर्यंत इंटरनेट साथी पोहोचलेले महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य असेल.
भाषाविषयक प्राविण्यासाठी प्रशिक्षण
शिक्षणामध्ये गुणवत्तापूर्वक बदल घडवून आणण्यासाठी भाषा विषयामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यांमध्ये २५० प्रशिक्षक तयार करण्यात येणार आहेत. तसेच यामुळे त्यांच्यात व्यावसायिक गुणवत्ता देखील विकसित होणार आहे.
मानवी मूल्यांवर आधारित प्रशासन
कारागृहातील कैद्यांना कायदेविषयक सहाय्य, शारीरिक-मानसिक आरोग्य सेवा तसेच कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांच्यात मूलगामी परिवर्तन घडविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ मध्यवर्ती कारागृहांमधील १० हजार कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत या सेवा पुरविण्यात येतील. यामुळे मानवी मूल्यांवर आधारित प्रशासन असणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य असेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रशासनाचे आदर्श मॉडेल
सांख्यिकी आधारित जिल्हा विकास आराखडा बनविण्यासाठी पहिल्या टप्प्यात नागपूर व चंद्रपूर अशा दोन जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवून प्रशासनाचे आदर्श मॉडेल निर्माण करण्यात येईल व नंतरच्या टप्प्यात हेच मॉडेल पूर्ण राज्यभर राबविण्याचा मानस असल्याचे सांगून या सर्व सुविधा सामंजस्य कराराद्वारे टाटा ट्रस्टमार्फत शासनाला विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात सकाळी अकराच्या सुमारास अन्न व नागरी पुरवठा विभाग, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, गृह, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, शिक्षण, नियोजन या विभागाच्या सचिवांनी टाटा ट्रस्ट सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.