मुंबईच्या लोकलमध्ये अनेक भिकारी दिसतात. काही जण गाणं गाऊन, टिपऱ्या वाजवून लोकांचं मनोरंजन करतात आणि त्यांच्याकडून पैसे मागतात. काही प्रवासी सहज पैसे देतात. सहानभुती म्हणून, तर काही त्यांना तुच्छतेनं वागवतात. हे गाणारे भिकारी मुंबईच्या जीवनाचा एक भाग झालाय. अनेकदा या भिकाऱ्यांमागे एखादं मोठं रॅकेट असल्याच्या बातम्या ही येतात. मग अशा भिकाऱ्यांकडे बघण्याचा सर्व सामान्यांचा दृष्टीकोन बदलेला असतो. त्याला शिव्याही खाव्या लागतात. पण यात ही अनेक जण रोजच आपलं गाण गात लोकांच मनोरंजन करत असतात. त्यातून पैसे कमवत असतात. या अश्या अनेकांना समाजात मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी मुंबईची एक तरुणी काम करतेय. हेमलता तिवारी. हेमलता तुमच्या-आमच्यासारखी सर्वसामान्य. जे आपल्याला मिळालं नाही अशी गायनाची कला असलेल्या शेकडो लोकांना तिनं स्वराधार या संस्थेअंतर्गत एकत्र आणलंय. ही संख्या वाढत जातेय हे विशेष.
हेमलता सांगते “ २०१० ला महाराष्ट्र दिनी ती ट्रेनमधून चर्चगेटला जात होती. भाईंदर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एका ठिकाणी काही लोकांच्या गाण्याचा आवाज येत होता. बाकीच्या लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली होती. गाणारे दोघेही अंध होते. पण त्यांनी चांगला साज धरला होता. आजूबाजूचे लोक ही त्यांच्या गाण्यावर मान हलवू लागले होते. या दोघांच्या समोर ठेवलेल्या ताटात पैसे टाकले जात होते. बऱ्यापैकी पैसे जमा झाले होते. तेवढ्यात ट्रेन आली आणि गर्दी ट्रेनमध्ये निघून गेली. मी ही या गर्दीत स्वत:ला हरवून घेतलं. चर्चगेटला उतरल्यावर ओवल मैदानात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम दिसला. तिथं उभारलेल्या स्टेजवर काही लोक गात होते. छोटेखानी ऑकेस्ट्रा होता तो. त्यावेळी मनात आलं की भाईंदरच्या त्या अंध लोकांसाठी असा स्टेज उपलब्ध झाला तर तेही सन्मानानं आपला उदरनिर्वाह करु शकतील. त्यांना असं प्लॅटफॉर्मवर किंवा ट्रेनमध्ये धक्के खात गात भीक मागावी लागणार नाही. यातूनच मग स्वराधार सुरु करण्याचा निर्धार मी घेतला.”
स्वराधारतर्फे दर रविवारी तीन तास अश्या लोकांना गाणं किंवा वाद्य वादनाचं प्रशिक्षिण दिलं जातं. ट्रेनिंग देणारे हे प्रशिक्षित संगीतकार असतात. ते समाजसेवेचा भाग म्हणून स्वराधाराशी जोडले गेलेत. अशाप्रकारे आत्तापर्यंत २०० हून अधिक जणांना स्वराधारमधून संगीताचं प्रशिक्षण देण्यात आलंय. ते ही अगदी मोफत.
हेमलता फक्त २१ वर्षांची होती जेव्हा तिनं स्वराधार सुरु केलं. ती एका खाजगी शाळेत शिकवायची. हे सुरु करण्यासाठी तिनं आपली नोकरी सोडली. तेव्हा लोकांनी तिला वेड्यात काढलं. हेमलता म्हणते “ हे असं करण्यासाठी थोडसं वेडंच असावं लागतं. त्याशिवाय शक्य नाही. दुसऱ्याला आनंदी बघण्यात जे समाधान आहे. ते आणखी कुठल्याही गोष्टीत नाही. हे सर्व करुन मला परमानंद मिळतो. भले लोकांनी त्यासाठी मला वेडं म्हटलं तरी चालेल.”
स्वराधारचा प्रचार चांगला होत आहे. अनेक ठिकाणाहून कार्यक्रमासाठी त्यांना बोलावणं येतंय. मुंबईतली कुठलीही अशी जागा नाही जिथं स्वराधारनं कार्यक्रम केलेला नाही. या स्वराधारमधून चांगले गायक किंवा वादक बाहेर पडावेत असं हेमलताला वाटतंय. संगीताच्या जगात या सर्वांनी आपलं नाव करावं असं ती म्हणते. या सर्वांना घेऊन वर्ल्ड टूर करायची हेमलताची इच्छा आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न ती करत आहे. स्वराधारबरोबर आता अनेक युवक जोडले गेलेत. ही युवक मंडळी स्वराधारला जागतिक स्तरावर घेऊन जातील असा विश्वास हेमलताला वाटतोय.